सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !
नवी देहली – उत्तराखंडमधील एका प्रकरणात १४ वर्षांच्या एका मुलीचा तिच्याच वर्गातील मुलाने अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्याने तो वर्गातील मित्रांमध्ये प्रसारित केला. अपकीर्ती झाल्याच्या धक्क्याने मुलीने आत्महत्या केली. ही घटना ऑक्टोबर २०२३ मधील आहे. या प्रकरणी मुलाला जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने त्या मुलाला जामीन नाकारला.
जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी मुलाला जामीन नाकारला होता. जामीन नाकारतांना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, हा मुलगा बेशिस्त असून. चुकीच्या संगतीला लागला आहे. त्याला कठोर शिस्तीची आवश्यकता आहे. जर त्याला सोडले, तर आणखी चुकीच्या घटना घडतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही.
यावर मुलाच्या आईने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे याचिकेवर न्यायमूर्ती बेला एम्. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मुलाला जामीन देण्यास नकार दिला.