रत्नागिरी – भगवद्गीता हे संवादांतून निर्माण झालेले सर्वांगसुंदर काव्य आहे. गीतेचा आजच्या काळातील अर्थ जाणून घ्यावा आणि प्रतिदिन प्रत्येक श्लोक तोंडपाठ म्हणावा. इतके केले, तरी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील पुष्कळशा समस्या सोडवण्यास मनोबल प्राप्त होईल, असे प्रतिपादन चरित्रकार आणि अभ्यासक श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
सद्गुरु डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवाराच्या वतीने येथील विठ्ठल मंदिरात ‘आजचा काळ आणि भगवद्गीता’ या विषयावर प्रवचनात श्री. मसुरकर बोलत होते.
श्री. मसुरकर पुढे म्हणाले की,
१. भगवद्गीता हा भारतासह विदेशातील पंडितांच्या कुतूहलाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. त्यांनी या ग्रंथाचा लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी उपयोग केला.
२. गीतेचा अभ्यास करून अनेकांनी मीमांसा, भाष्य, टिप्पणी केली आहे. संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी सुरेख लिहिले आहे.
३. महाभारतामध्ये आप्तेष्टांना मारावे लागणार या कल्पनेने अस्वस्थ झाल्याने शस्त्रत्याग करून रणांगणावर बसकण मारणार्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या रथाचे सारथ्य करणार्या श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे गीतेचे सार होय.
४. आज विद्यार्थी, पालक, शेतकरी, नोकरदार, संसारी माणसे अर्जुनासारखी मनस्थिती अनुभवत आहेत. गीता त्यांचे प्रबोधन करू शकेल. याकरता गीता जाणून घ्यावी.
५. जीवनशैली पालटली आहे. जीवनसंघर्ष अटळ बनला आहे. विचारांची जागा विकाराने घेतली आहे. या सर्व परिस्थितीतून सकारात्मक पावले टाकायची असतील, तर भगवद्गीता हे त्यासाठी बळ देणारे साधन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आजही तितकीच उपयुक्त आणि परिणामकारक आहे.
६. गीता हा धर्मग्रंथ जड नाही, कुणीही वाचू शकतो. त्याचा अर्थ काढून आपण जगलो, तर जीवन निश्चितच सुखकारक होईल.
७. गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात भारतीय लोक न्यून पडत आहेत. गीतेचे पठण आणि अध्ययन करण्याकडे वळणार्यांची संख्या अल्प आहे. सर्वांत वाईट गोष्ट अशी की, गीता वगैरे संस्कृत आणि प्राचीन ग्रंथ हे आपले नव्हेत, असे मानण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
या कार्यक्रमात स्वागत आणि प्रास्ताविक स्वप्नाली जोशी, सद्गुरु स्तवन प्रांजली विलणकर, प्रार्थना सौ. गीता रुणकर आणि गवळण अनुया बाम यांनी सादर केली. या प्रसंगी श्री. मसुरकर यांचा सन्मान करण्यात आला.