Beaten to Death by Liquor Mafia : राजस्थानमध्ये दारू माफियांकडून एकाची हत्या !

४८ तासांत २ जणांना अटक, ४ जण फरार !

जयपूर (राजस्थान) – राज्यातील झुंझुनू येथे घडलेल्या या घटनेत येथील दारू माफियांनी गोशाळेतील एका कर्मचार्‍याला अमानुष मारहाण केली. कर्मचार्‍याला तब्बल ६ घंटे मारहाण करण्यात आली. रामेश्‍वर वाल्मिकी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या वेळी एका अल्पवयीन आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला. हृदयद्रावक असलेला हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत मारेकर्‍यांचा शोध चालू केला असून ४८ घंट्यांत २ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना झुंझुनू जिल्ह्यातील बालोदा गावातील असून ती १४ मे या दिवशी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची नुकतीच माहिती दिली.

व्हिडिओत आरोपींनी २७ वर्षीय रामेश्‍वरचे हात-पाय बांधून त्याला भूमीवर झोपवले आणि त्यानंतर त्याच्या शरीरावर अनेक वार केल्याचे दिसत आहे. बालोदा गावात दारू माफिया आणि अवैध मद्य बनवणार्‍यांमध्ये शत्रुत्व आहे. अशातच रामेश्‍वर वाल्मिकी हा अवैध मद्य बनवणार्‍यांच्या संपर्कात असल्याने दारू माफियांचा त्याच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांनी रामेश्‍वरचे अपहरण करून त्याला एका घरात नेले आणि त्याची हत्या केली. रामेश्‍वर हा एका गोशाळेतही काम करत होता.

संपादकीय भूमिका

देशातील प्रत्येक जिल्ह्यात दारू माफिया, वाळू माफिया, खाण माफिया यांसारख्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांचे अस्तित्वच सरकारने संपवले पाहिजे !