२२ मे या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन आहे. त्यानिमित्त…
२२.५.२०२४ या दिवशी आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन आहे. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना स्फुरलेले काव्य येथे देत आहोत.
शिवगुरु (वडील) होते श्रद्धावान, वेदपारंगत शास्त्रसंपन्न ।
कालटीला (टीप १) होते मूळ स्थान,
पंचक्रोशीत होता त्यांना मान ।। १ ।।
आर्यांबा (आई) असे भाग्यवान, कार्यकुशल अन् चारित्र्यवान ।
उभयतांना नव्हते संतान, आर्यांबेला वाटत होते असमाधान ।। २ ।।
आर्ततेने केले शिवस्मरण अन् ध्यानामध्ये झाले तल्लीन ।
शिवगुरूंना दृष्टांत झाला । तेजस्वी पुत्र येईल जन्माला ।। ३ ।।
शंभू महादेव दोघांना पावला, उभयतांचा भाग्योदय झाला ।
यथासमयी पुत्र जन्म झाला, ईश्वराचा जणू प्रसाद मिळाला ।। ४ ।।
भगवतीच्या मंदिरात चमत्कार झाला, बाळ शंकर नैवेद्य घेऊन आला ।
देवीचे स्तोत्र रचून गाऊ लागला, तिला नैवेद्य भरवून बाळ परतला ।। ५ ।।
शंकराने रचलेले देवीस्तोत्र ऐकले आणि माता-पिता अचंबित झाले ।
चिमुकल्या बाळाचे कौतुक वाटले, आईने त्यास प्रेमाने कवटाळले ।। ६ ।।
५ वर्षांच्या शंकराचे मौंजीबंधन झाले, शिवगुरु इहलोक सोडून गेले ।
आर्यांबेला दु:ख अनावर झाले, पित्यावाचून बाळ पोरके झाले ।। ७ ।।
शंकराच्या प्रतिभेने गुरु प्रसन्न झाले, ऋतंभरा प्रज्ञेने ज्ञानामृत चाखले ।
गुरुकुलाचे ज्ञान प्राशन केले अन् २ वर्र्षांत शिक्षण पूर्ण झाले ।। ८ ।।
घरी येऊन शंकराने गुरुकुल चालू केले, बाल गुरूंपुढे प्रौढ शिष्य बसले ।
शंकराचे बोल ऐकून नवल वाटले, दृश्य पाहून सर्व भारावून गेले ।। ९ ।।
मातेला पुष्कळ अशक्तपणा आला, ती जाऊ न शकली नदीस्नानाला ।
शंकरने पूर्णा नदीचा प्रवाह वळवला,
घराजवळ आणले पूर्णा नदीच्या प्रवाहाला ।। १० ।।
ज्योतिषांनी शंकराचे भविष्य सांगितले,
शंकराच्या कीर्तीचे भाकित केले ।
अल्प आयुष्याचे गूढ समजले
अन् मातेने शंकराला अधिकच जपले ।। ११ ।।
शंकराने राजाची संपत्ती नाकारली,
राजाला बाल वैराग्याची ओळख पटली ।
शंकराने संन्यास घेण्याची विचारणा केली,
मातेने त्यास अनुमती नाकारली ।। १२ ।।
नदीत मगरीने शंकराचा पाय धरला, शंकर जोराने किंचाळू लागला ।
संन्यास दिक्षेचा हट्ट केला, तेव्हा मातेचा जीव कासावीस झाला ।। १३ ।।
हतबल झालेल्या मातेने होकार दिला, मगरीने शंकराचा पाय सोडला ।
नदीत बुडता बुडता वाचला,
ते पाहून मातेचा जीव भांड्यात पडला ।। १४ ।।
गुरूंच्या शोधात शंकर निघाला, तो नर्मदातिरी गुरूंच्या आश्रमात आला ।
त्याला दीक्षा अन् गुरूमंत्र मिळाला,
शंकर गोविंदपादांचा शिष्य झाला ।। १५ ।।
शंकर आत्मज्ञानी झाला, शिवदशेत स्थिरावून शंकराचार्य झाला ।
शंकराचार्यांनी धर्मप्रसार केला,
संपूर्ण भरतखंडात धर्मध्वज फडकू लागला ।। १६ ।।
शंकराचार्यांनी शास्त्रार्थ केले, सांप्रदायिकांना हरवून विवाद जिंकले ।
पाखंडी विचार निष्प्रभ झाले, बौद्ध-जैन-चार्वाक तत्त्वज्ञ हरले ।। १७ ।।
शंकराचार्यांनी चांडाळाच्या वेशातील शिवाला गुरु मानले,
नमन करून ज्ञान प्राप्त केले ।
कुमारिल भट्टपादांना भेटले, सार्या मीमांसकांना पराजित केले ।। १८ ।।
सुरेश्वरन्, पद्मपादाचार्य, हस्तामलक आणि तोटकाचार्य ।
या चार प्रमुख शिष्यांकडे सोपवले धर्मकार्य,
चारही पिठांवर नेमले त्यांना धर्माचार्य ।। १९ ।।
शंकराचार्य विजययात्रा पूर्ण करून आले,
त्यांनी विपुल ग्रंथांचे लिखाण केले ।
धर्मासाठी आयुष्य वेचले, अद्वैत सिद्धांत आचरणातून शिकवला ।। २० ।।
शंकराचार्यांनी धर्मसंस्थापना केली,
सर्वत्र धर्माची पताका फडकली ।
धर्माला आलेली ग्लानी दूर झाली,
दशदिशांमध्ये धर्माची कीर्ती पसरली ।। २१ ।।
धर्मसंस्थापनेचे कार्य पूर्ण झाले आणि आता निर्वाणाचे वेध लागले ।
आचार्यांनी कैलासगमन केले अन् ते अनंतात विलीन झाले ।। २२ ।।
टीप १ – भारतामधील केरळ राज्यातील ‘कालटी’ हे गाव आद्य शंकराचार्य यांचे जन्मस्थान आहे.
प्रार्थना
‘हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हाला आद्य शंकराचार्यांप्रमाणे बल, बुद्धी आणि भगवंताचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत’, अशी भगवंताच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |