सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांचा आनंदोत्सव !

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव महर्षींच्या आज्ञेनुसार ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. शत प्रतिशत व्यापक, सागराइतकी प्रीती आणि करुणामय असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना मिळाली होती. ते अनुभवल्यानंतर मला गुरुकृपेने सुचलेले विचार येथे मांडले आहेत.

२१ मे २०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/795772.html 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१०. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त १४.५.२०२३ आणि १५.५.२०२३ या दिवशी झालेले कार्यक्रम

१० अ. दैवी बालक आणि गुरुदेव यांच्या संवादाचा चलचित्रपट

१० अ १. उच्च लोकातून आलेल्या बालसाधकांच्या बोलण्यातून त्यांच्या प्रगल्भतेची प्रचीती येणे : १४.५.२०२३ या दिवशी चंडिका यज्ञाच्या पूर्वार्धात गुरुदेवांशी उच्च लोकातील दैवी बालकांचा झालेला सत्संग अद्भुत होता. गुरुदेवांच्या कृपेने उच्च लोकातून आलेल्या या बालसाधकांच्या उत्तरात त्यांच्या प्रगल्भतेची प्रचीती येत होती. त्यातून ‘उच्च लोकातून आलेले जीव कसे असतात ?’, हे जगाला पुराव्यांसह समजावून दिले गेले. या जगात असे उच्च लोकातून आलेले जीव शोधून त्यांना साधनेचे बळ देऊन उद्धार करणार्‍या गुरूंच्या चरणी कोटीशः नमन ! गुरूंसह या बालकांचा झालेला संवाद ऐकतांना वारंवार भावजागृती होत होती. बालकांचा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाला दिलेले उत्तर बालकांची पूर्वजन्माची साधना स्पष्टपणे दाखवत होते. त्यांचे वागणे, बोलणे आणि कृती यांतून हे बालसाधक उच्च लोकातून आले असल्याची प्रचीती येत होती. गुरुदेवांसह अशा जिवांना सामूहिक रीतीने एकत्र पहाण्याचे भाग्य आणि त्यातून लाभलेली चैतन्याची स्पंदने अपार होती. अशा जिवांना शोधून आणणार्‍या आणि साधनेचे बळ देणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

पू. उमेश शेणै

१० आ. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी चंडिहोम : गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी झालेला चंडिहोम साधकांना नवचैतन्य देणारा होता. देवीमाहात्म्यात सांगितल्याप्रमाणे देवीने चंड-मुंड, मधु कैटभ (विष्णुकडून), शुंभ निशुंभ, रक्तबिजासुर आणि महिषासुर इत्यादी राक्षसांचा संहार करून जगत कल्याण केल्याची पुराणकथा आम्हा सर्वांना आठवण करून देणारी होती. या होमासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती. या होमात अर्पण केलेला हविर्भाग सरळ श्रीदेवीच्या चरणी पोचत असल्याचे जाणवत होते. ‘देवी प्रत्येक हविर्भाग आनंदाने स्वीकारून आपले आशीर्वाद म्हणून सुवर्ण रंगाची ज्वाला सर्वांना दाखवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणार्‍या सर्व अडथळ्यांचे निवारण होणार असल्याचा संकेत देत आहे’, असे जाणवले. मंत्रातून निर्माण झालेली स्पंदने संपूर्ण यज्ञशाळेला व्यापून चैतन्य पसरवत होती. ‘यज्ञकुंडातून देवीतत्त्वाचे चैतन्य भरभरून बाहेर पडत आहे’, हे त्यातील ज्वाळांवरून अनुभवता येत होते. ज्वाळेच्या सुवर्ण रंगाच्या प्रकाशामुळे संपूर्ण वातावरण सुवर्णमय झाले होते. ‘साक्षात ऋषिमुनी आणि देवता यांनी या यज्ञाचे यजमानपद घेतले आहे’, असे जाणवत होते. ‘हे सर्व गुरूंच्या आध्यात्मिक शक्ती आणि संकल्प शक्ती यांमुळे होत आहे’, असे साधक अनुभवत होते.

१० इ. गुरुदेवांकडून प्रक्षेपित झालेल्या आनंद लहरींमुळे सर्व साधकांना त्यातील चैतन्य ग्रहण करणे शक्य होणे : १५.५.२०२३ या दिवशी पुढे चालू असलेल्या चंडिहोमातून देवीतत्त्व भरभरून बाहेर पडत होते. ‘गुरुकृपेने साधकांची प्रगती होत असतांना गुरुदेवांनी त्याचे सर्व श्रेय साधकांना देणे’, हे त्यांची अहंशून्यता ठळकपणे दर्शवते. साधकांचे कौतुक करण्यातच आपला आनंद पहाणार्‍या गुरुदेवांविषयी कितीही सांगितले, तरी अल्पच आहे. गुरुदेवांकडून प्रक्षेपित झालेल्या आनंदलहरींमुळे सर्व साधकांना त्यातील चैतन्य ग्रहण करणे शक्य झाले. गुरूंकडून साधकांकडे निरंतर चैतन्य प्रक्षेपित होत असून साधकांना त्याचा लाभ होत असल्याचे अनुभवता येत होते.

१० ई. चंडिहोमाच्या वेळी झालेल्या गुरूंच्या संकल्पामुळे ‘अनिष्ट शक्तींचे दमन होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना वेगाने होईल’, याची निश्चिती वाटणे : १५.५.२०२३ पासून पुढे होत असलेला चंडिहोमही सर्वत्र चैतन्य पसरवत असल्याचा भास होत होता. सुवर्ण रंगाच्या ज्वाळेमुळे एकेक हविर्भाग यागाच्या देवता स्वीकारून आपल्या सोनेरी ज्वाळेतून दृढ करत होत्या. या दिवशी यागाच्या वेळी गुरुदेवांच्या उपस्थितीमुळे चंडिहोमाचे चैतन्य द्विगुणित झाले. पूर्णाहुतीच्या वेळी, तर अग्नी ज्वालेच्या सुवर्ण रंगाने पूर्ण परिसरच सोनेरी रंगात परिवर्तित झाला. चंडिका यागात झालेला गुरूंच्या संकल्पामुळे या यज्ञाने अनिष्ट शक्तींचे दमन होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना वेगाने होईल, यात संशयच नाही. हे सर्व म्हणजे ईश्वरी राज्याच्या स्थापनेत गुरुदेवांनी टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

ब्रह्मोत्सवासाठी सिद्ध केलेल्या रथावरील गरुडाची मूर्ती

सप्तर्षींच्या आज्ञेने रथाच्या समोरच्या भागात बसवण्यात आलेली विष्णुवाहन गरुडाची दास्यभावातील मूर्ती

रथाच्या पुढच्या भागात कोरलेले गरुडदेव स्वतः विष्णूचा अवतार असलेल्या गुरुदेवांनी भूदेवी अन् श्रीदेवी यांचा अनुक्रमे अवतार असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना घेऊन साधकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ करून दिला, असे साधक अनुभवत होते. रथावर असलेल्या घुमटातून विष्णुतत्त्व, तसेच भूदेवी आणि श्रीदेवी यांचे तत्त्व एकत्र होऊन साधकांवर प्रक्षेपित होत असल्याने साधकांना अधिक चैतन्याचा लाभ मिळाला. संपूर्ण नभोमंडल चैतन्याने भारित झाले होते. ऋषी-मुनी आणि देवता या ब्रह्मोत्सवात आसनस्थ गुरूंवर आणि माताद्वयींवर आपली आशीर्वादयुक्त पुष्पवृष्टी करत असलेले अनुभवता येत होते. देवता, ऋषी आणि किन्नर या ब्रह्मोत्सवात सहभागी झाले असल्याचे साधक अनुभवत होते. चैतन्याने भारित असा हा ब्रह्मोत्सव होता.

११. प्रार्थना

‘हे गुरुदेव, अमर्याद अशा तुमच्या संकल्प शक्तीमुळे प्रत्येक कार्य होत असलेले आम्ही पहात आहोत. तुम्ही आम्हा सर्व साधकांना साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्यासाठी पुष्कळ परिश्रम करत आहात. गुरुदेव, तुम्ही आम्हाला दाखवलेला मार्ग आणि शिकवलेल्या साधना मार्गावर चालण्यासाठी आम्हाला शक्ती अन् बुद्धी देऊन तुम्हीच हात धरून पुढे घेऊन जा. अज्ञानी अशा आम्हाला तुमच्या कृपाशीर्वादाविना दुसरा मार्गच नाही. साधनेत इथपर्यंत तुम्हीच आम्हाला घेऊन आलेले आहात आणि यापुढेही तुम्हीच आम्हाला मोक्षाकडे घेऊन जाणार आहात. तुमच्या कोमल चरणी आम्हाला स्थान देऊन कृतार्थ करा, गुरुदेव, हीच तुमच्या चरणी आम्हा साधकांची विनम्र प्रार्थना.’ (समाप्त)

– कृष्णार्पणमस्तु,

(पू.) उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक