दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्या वाईट परिणामांविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. ‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे. ‘सकाळी रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा किंवा कॉफी तर घेऊ नयेच; पण जेवण किंवा नाश्ता यांच्याआधी आणि नंतर एक घंटा तरी चहा अन् कॉफी यांचे सेवन करू नये’, असेही परिषदेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दूध कधी प्यावे ?’ याविषयीची माहिती जाणून घेऊया.
१. ‘जेवण एका तासात पचत नाही. त्यामुळे जेवणानंतर दूध घेऊच नये.
२. भूक असतांना दूध प्यायला हवे, असे आयुर्वेदात आहे.
३. सकाळी जर चहाऐवजी दूध घेत असू, तर ते पचल्यानंतरच, म्हणजे भूक लागल्यानंतरच काहीतरी खावे.
४. दूध प्यायल्यानंतर २ ते ३ घंटे काही खाऊ नये.
५. रात्रीचे दूध प्यायचे झाल्यास रात्रीचे जेवण पचल्यानंतर दूध घेतले तर चालते; पण जेवण उशिरा झाले आहे आणि झोपतांना दूध प्यायले, तर ते दूध पचणार नाही.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१७.५.२०२४)