|
पुणे – शहरात झाडे तोडून उभ्या केल्या जाणार्या होर्डिंगची अनुमती रहित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी २ दिवसांपूर्वीच दिले आहेत; मात्र आता महापालिकेच्या समोर भर रस्त्यात पी.एम्.पी.ला (पुणे महापालिकेला) होर्डिंग उभे करण्याची अनुमती आकाशचिन्ह विभागाने दिली आहे. यासाठी झाडाच्या अनेक फांद्याही तोडल्या आहेत. या संदर्भात अधिकार्यांना विचारल्यावर ही अनुमती रहित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. यामध्ये अनधिकृत होर्डिंग्जच्या सांगाड्यात विनाअनुमती पालट केला असल्यास, तसेच झाडे तोडून होर्डिंग्ज उभारले जाणार असल्यास अशांवरही कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत.
आकाशचिन्ह विभागासाठी वर्ष २०२२ मध्ये नवीन नियमावली घोषित केली आहे. ‘पदपथावर, तसेच सार्वजनिक रस्त्यावर कोणताही विज्ञापनफलक लावता येणार नाही’, असे या आदेशात नमूद केले आहे; मात्र या नियमाचे उल्लंघन करून आकाशचिन्ह विभागाने पी.एम्.पी.ला होर्डिंग उभारण्याची अनुमती दिली आहे. ज्या ठिकाणी होर्डिंग उभे केले जात आहे, तेथे पी.एम्.पी.चा बस थांबा असून अनेक प्रवासी तेथे बससाठी उभे असतात. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता महापालिकेने थेट अनुमती दिली असून या होर्डिंगमुळे महापालिकेची इमारतही झाकली जाणार आहे. मुख्य खात्याने ही अनुमती कशी दिली ? असा प्रश्न विचारल्यावर ‘ही अनुमती रहित केली जाईल’, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाएकमेकांशी समन्वय नसणार्या विभागांमुळेच प्रशासनाची कार्यक्षमता घटते, नागरिकांना त्रास होतो, हे लक्षात घ्यावे ! |