नवी मुंबई, १८ मे (वार्ता.) – वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आर्.टी.ई. (बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडूसकर यांनी केले आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या आर्.टी.ई. प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या संकेतस्थळावर १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण ९८ पात्र शाळा आहेत.
सदर प्रक्रियेसाठी पात्र असणार्या (वंचित गट – SC/ST/NT/VJ/OBC/SBC, दुर्बल गट १ लाखापेक्षा अल्प उत्पन्न, अपंग बालकाचे ४०% अपंगत्व, एच्.आय.व्ही. बाधित किंवा एच्.आय. व्ही प्रभावित बालके, अनाथ बालके) अधिकाधिक पालकांनी प्रवेश प्रकियेत त्यांच्या बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगेश कडूसकर यांनी केले आहे.