पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशांची मागणी या गोष्टींना वैतागून त्यागपत्र दिल्याचे पत्रात नमूद !
पुणे – लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे पुणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. पुणे येथील उबाठा युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे त्यागपत्र दिले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशांची मागणी या गोष्टींना वैतागून अनेकांनी त्यागपत्र दिल्याचे पत्रात म्हटले आहे. संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले; पण पदाधिकार्यांकडून घाणेरडी वागणूक मिळाल्याचा आरोप त्यागपत्र दिलेल्या पदाधिकार्यांनी केला आहे. हे सगळे पदाधिकारी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
पुण्यातील निवडणूक पार पडली आहे; मात्र येत्या काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकार्यांनी त्यागपत्र दिल्याने पुणे येथे ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पत्रात नेमके काय आहे ?
पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेना पक्ष आणि मतभेद हे कायम पहायला मिळत होते. युवासेना पदांसाठी पैशांची मागणी केली जात होती. या सर्व त्रासाला वैतागून आम्ही सर्व युवासेनेचे निष्ठावंत पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, महाराष्ट्रातील जनतेचे लोकसेवक कार्यक्षम मुख्यमंत्री यांच्या कामाने आणि खर्या शिवसेनेच्या विचाराने प्रेरीत होऊन यापुढे आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पुर्वेश सरनाईक अन् युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह पुढील राजकीय तसेच सामाजिक काम करण्याचा निश्चय केला आहे. आमच्यासह असंख्य पदाधिकारी प्रवेश करत आहेत.