भारतीय रुपयाचे वाढते महत्त्व आणि अमेरिकी डॉलरची घसरगुंडी !

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये व्यवहार करतात, म्हणजेच खरेदी-विक्री करतात, असे आपण ऐकलेले आणि वाचलेले आहे. ज्यांना विदेशात जाण्याची, तेथे रहाण्याची संधी मिळाली आहे, त्यांना डॉलर हाताळण्याची संधी मिळाली आहे. ज्यांना विदेशातून भारतात यायचे असते अथवा भारतातून विदेशात जायचे असते, त्यांना चलन अनुक्रमे डॉलरचे रुपयांत आणि रुपयांचे डॉलरमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. रुपयांतून डॉलर खरेदी करतांना अधिक रुपये भरून केवळ काही डॉलर मिळतात, हे लक्षात येते.

१. भारतीय रुपयाचे अवमूल्यन

भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणजे वर्ष १९४७ मध्ये १ भारतीय रुपयाचे मूल्य १ अमेरिकन डॉलर एवढे होते. त्यानंतर अमेरिकन डॉलरचे मूल्य सातत्याने वाढत, तर रुपयाचे अवमूल्यन होत गेले. सध्या १ अमेरिकन डॉलर म्हणजे ८३.५२ रुपये आहे, म्हणजे भारतियांना शेकडो डॉलर घेण्यासाठी सहस्रो रुपये व्यय करावे लागतात.

श्री. यज्ञेश सावंत

रुपयाच्या अवमूल्यनासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यामध्ये व्यापार असमतोल, अर्थसंकल्पीय तूट, महागाई, जागतिक इंधनाच्या किमती वाढणे, आर्थिक अडचणी यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नियमांनुसार ‘परव्हॅल्यू सिस्टम’ अंगीकारली. स्वातंत्र्यानंतर रशियाप्रमाणे पंचवार्षिक योजनेचा भारताने स्वीकार केला. त्यासाठी निधीची आवश्यकता भासत असल्याने मोठ्या प्रमाणात विदेशी कर्ज घेण्यात आले. त्यामुळे २ वर्षांतच १ डॉलर म्हणजे पावणे पाच रुपये एवढे मूल्य घसरले. नंतर भारत-पाक, भारत-चीन आणि पुन्हा भारत-पाक अशी युद्धे झाली, भयंकर दुष्काळ पडला, तत्कालीन कर्ज घेण्याची क्षमताही संपल्याने रुपयाचे आणखी अवमूल्यन झाले. तेव्हा १ डॉलर म्हणजे ७ रुपये असे मूल्य झाले. वर्ष १९९० पर्यंत १ डॉलर म्हणजे १७.५० रुपये झाले. त्यानंतर रुपयाची घसरण होत गेली. त्यालाही तत्कालीन काही कारणे कारणीभूत आहेत. अशा प्रकारे रुपयाचे अवमूल्यन होतच आहे. अमेरिकन डॉलरचे महत्त्व जे पहिल्या जागतिक महायुद्धापासून वाढण्यास प्रारंभ झाला, ते वाढतच राहिले आहे. असे असले तरी आता भारतही जागतिक व्यापारात घौडदौड करत असल्यामुळे भारतीय रुपयाचे मूल्य वाढण्यास प्रारंभ झाला आहे.

२. भारतीय रुपया डॉलरची जागा घेण्यास सज्ज !

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला १ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.  भारत आणि रशिया यांच्यात फार जुने संबंध आहेत. रशियाकडून भारत अनेक प्रकारची हत्यारे, लढाऊ विमाने खरेदी करतो. यात एक महत्त्वाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेणारे पाऊल म्हणजे रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय ! युरोपियन देश आणि अमेरिका यांच्याकडून युद्धखोर म्हणवल्या जाणार्‍या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर पुष्कळ टीका झाली; मात्र भारताने रशियाशी खरेदी व्यवहार करतांना डॉलरच्या ऐवजी भारतीय रुपयांमध्ये व्यवहार केला. रशियाकडून तेल खरेदी करतांना भारताने रुपयांमध्ये व्यवहार करून स्वत:चे ३० बिलियन (२५० कोटी रुपयांहून अधिक) डॉलर्स वाचवले आहेत. यामुळे आणखी ३५ देशांनी भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करण्याची मनीषा बोलून दाखवली आहे. सध्या १८ देशांनी भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करणे चालू केले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यावर अशा युद्धांमध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची असते; कारण जेव्हा कधी युद्धजन्य स्थिती जगात उद्भवते, तेव्हा अमेरिका डॉलरचा एक शस्त्र म्हणून उपयोग करते, म्हणजे अमेरिकेकडून शस्त्रे, लढाऊ साहित्य खरेदी करण्यामुळे आपोआपच डॉलरचे महत्त्व अबाधित रहाते. ज्याच्याकडे डॉलर आहेत, तोच अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करू शकतो. या वेळी अमेरिकेने रशियावर पुष्कळ निर्बंध घातले आणि डॉलरच्या पद्धतीतूनच रशियाला बाहेर काढल्यामुळे, रशियाने इराण आणि चीन या त्याच्या मित्र देशांसमवेत व्यवहार करण्यासाठी वेगळे चलन आणले, म्हणजेच ‘क्रिप्टो करन्सी’ (आभासी चलन) मध्ये व्यवहार करणे चालू केले. परिणामी डॉलरचे महत्त्व न्यून झाले.

अमेरिकेतील काही बँका ज्यामध्ये सिलिकॉन व्हॅली बँक नवीन ‘स्टार्ट अप्स’ना (उद्योगांना) अर्थसाहाय्य करते; मात्र हे उद्योग बुडाल्यामुळे बँकाही बुडाल्या. परिणामी अमेरिकेची परकीय चलन गंगाजळी न्यून होत गेली. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापारात ८० टक्के चलन म्हणून वापरले जाणार्‍या डॉलरचा एकूण व्यापारात उपयोग ६० टक्के एवढा न्यून झाला. भारत शासनाने या परिस्थितीचा लाभ करून घेण्यासाठी जगातील देशांना व्यापारासाठी एक ‘वॉचस्ट्रो अकाऊंट’ (एक व्यापारी खाते) भारतीय बँकांमध्ये चालू करण्यास सांगितले. दुसरे म्हणजे भारतीय रुपयांमध्ये खरेदी करता येतील, असे ‘मसाला बाँड’ (हमीपत्राचे नाव) उपलब्ध करून दिले. मसाला बाँड, म्हणजे मसाल्याशी त्याचा संबंध नसून त्याला एक भारतीय नाव दिले आहे. रुपयाचा वापर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात येत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे श्रीलंकेकडे डॉलरची कमतरता असल्याने त्याने इराणकडून तेल खरेदीसाठी भारतीय रुपयांचाच उपयोग केला.

३. पेट्रोडॉलरलाही धक्का !

आखाती देशांच्या अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. पेट्रोल विकून डॉलर मिळवणे ! यावर आखाती देश प्रचंड श्रीमंत झाले. आखाती देशांकडून पेट्रोल खरेदी करण्यासाठी डॉलरमध्ये व्यवहार करावा लागतो. आखाती देश त्यांच्याकडे आलेल्या डॉलरमधून देशाच्या गरजा भागवल्या की, शेष डॉलर अमेरिकेतील उद्योग, प्रकल्प यांमध्ये गुंतवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे ‘पेट्रोडॉलर’ संज्ञेचा उगम झाला. भारताचा विचार करता भारत मात्र आता इंधन खरेदीचे व्यवहार रुपयांमध्ये करत आहे. आखाती देशांनीही भारताकडून बोध घेत चीनशी चीनच्या चलनात व्यवहार केले, म्हणजे डॉलरला वगळले आहे.

४. ‘यूपीआय’ पद्धत जगातील ३० देशांमध्ये कार्यान्वित

भारताच्या ‘नॅशनल पेमेंट कार्पाेरेशन ऑफ इंडिया’द्वारे ‘यूपीआय’, म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ ही पैशांचे व्यवहार अतिशय वेगामध्ये करण्यासाठी विकसित केलेली प्रणाली आहे. भारताने ही पद्धत जगातील ३० हून अधिक देशांमध्ये कार्यान्वित केली आहे. या पद्धतीमुळे त्या देशांमध्ये गेल्यावर व्यवहार करतांना त्या त्या देशांच्या चलनामध्ये थेट इलेक्ट्रॉनिक व्यवहार होणार आहेत. परिणामी त्या त्या देशांचे चलन बाळगण्याची आवश्यकता रहाणार नाही. हा मोठा लाभ भारताने करून दिला आहे. अत्यंत अल्प वेळेत (रिअल टाईम) पैशांचा व्यवहार करण्यासाठीची ही जगातील सर्वाेत्तम पद्धत बनली आहे. पैशांचा व्यवहार करण्यासाठीच्या आधीच्या पद्धतींमधील क्लिष्टता, गुंतागुंत, वेळकाढूपणा यांना फाटा देण्यात आला आहे.

वर्ष १९६० मध्ये भारतीय चलन २० देशांमध्ये वापरले जायचे. दक्षिण आशियातील देशांमध्ये चलनामध्ये भारतीय रुपये होते आणि रुपयाचे हे महत्त्व पुनर्प्रस्थापित करण्यासाठी भारत शासन प्रयत्नशील आहे. स्वत:च्या तिजोरीत डॉलरचे प्रमाण वाढवणे, ही दक्षिण आशियातील देशांसाठी तशी डोकेदुखीच आहे. त्या तुलनेत भारतीय रुपयाचे महत्त्व वाढल्याने त्यांना भारतीय रुपयांमध्ये व्यवहार करता येणार असल्यामुळे लाभच होणार आहे. दक्षिण आशियातील मान्यताप्राप्त चलन म्हणून भारतीय रुपया जागा सिद्ध करत आहे. श्रीलंकेच्या व्यापार विभागाच्या प्रमुखांनी त्यांनी भारतीय रुपयांमध्ये व्यवहार चालू केल्यामुळे त्यांचा ५० टक्के व्यवहार मूल्य वाचत आहे आणि प्रत्येक व्यवहारामागे डॉलरची बचत करता येत आहे. यामुळे अन्य देशांनाही या यंत्रणेचा भाग व्हायचा आहे.

५. भारतीय व्यापार्‍यांना लाभ

जगात अनेक देशांचे चलन उपलब्ध आहे; मात्र अमेरिका ही बलाढ्य आणि नेतृत्व करणार्‍या देशांपैकी एक, तसेच मोठ्या प्रमाणात व्यापार करत असल्याने डॉलरचे महत्त्व वधारले आहे. डॉलरऐवजी रुपयांमध्ये व्यवहार करण्यामुळे भारतीय व्यापार्‍यांचा व्यापार वाढणार, तसेच बचतही होऊ शकणार आहे. भारतातील छोटे, मध्यम व्यापारी यांना व्यवहार करता येण्यासाठी भारतीय रुपयांवर आधारित पद्धतच पुष्कळ लाभदायी होणार आहे. अमेरिकन डॉलरचे भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी २ टक्के एवढे मूल्य द्यावे लागते, तेही वाचणार आहे. यातून व्यापार्‍यांची बचतच होणार आहे. यामुळे भारताची आयात-निर्यात तूट भरून निघू शकणार आहे. भविष्यात डॉलरमध्ये काही चढ-उतार झाल्यास भारताला काही फरक पडणार नाही. गुंतवणूकदारांसाठीही रुपयांमध्ये व्यवहार करणे लाभदायक आहे. वर्ष १९९९ मध्ये जागतिक व्यवहारात रुपयाचा वापर ०.२ टक्के होता, तो आता १.६ टक्क्यांवर आला आहे.

प्रसिद्ध अर्थतज्ञ नॉरिअय रूबेनी यांनी सांगितले, ‘भारतीय रुपयाच्या उदयामुळे डॉलरचे महत्त्व ६० टक्क्यांहून न्यून होऊन ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. भारताने रशिया, फ्रान्स यांसारख्या मोठ्या देशांमध्ये ‘यूपीआय’ पद्धत चालू केल्याने, तसेच त्या देशांनाही त्याची उपयुक्तता लक्षात आल्याने भारतीय पद्धतीचा अधिक प्रसार होईल, यात शंकाच नाही.’ भारताचे जागतिक स्तरावर वाढत असलेल्या प्रभावामुळे भारत जे काही करील, ते यापुढे जगाला स्वीकारावे लागणार आहे. भारतीय चलनाचा प्रसार आणि वापर हा त्याचाच प्रकार आहे. जगात ज्या देशाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे, मुख्य म्हणजे सोन्याचे साठे अधिक प्रमाणात आहेत, तो देश जगाचे व्यवहार ठरवू शकतो. जे आतापर्यंत आपण अमेरिकेविषयी पाहिले. भारत मात्र गुणवत्ता, तंत्रज्ञान यांच्या बळावर पुढे जात आहे. अनेक देशांशी भारताने सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारताचा प्रभाव वाढत जाणार असून एक दिवस डॉलरला पर्याय म्हणून रुपया पूर्णपणे स्वीकारला जाईल हे निश्चित !’

श्री गुरुचरणार्पणमस्तु।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१५.५.२०२४)