आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंद

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांनी देहली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांची येथील एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना आरोपी केले आहे. लवकरच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

पोलीस मारहाणीच्या अन्वेषणासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रीकरण पडताळण्यासह तेथील कर्मचारी आणि पोलीस यांचीही चौकशी करणार आहेत.

केजरीवाल यांनी बाळगले मौन !

उत्तरप्रदेशाची राजधानी लक्ष्मणपुरी येथे पत्रकार परिषदेत देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्रकारांनी मालीवाल यांच्या मारहाणीच्या प्रकरणी प्रश्‍न विचारला असता केजरीवाल यांनी उत्तर देण्याचे टाळत मौन रहाणे पसंत केले. त्या वेळी उपस्थित समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर देतांना म्हटले की, या प्रश्‍नापेक्षाही महत्त्वाची आणि मोठी सूत्रे आहेत.

संपादकीय भूमिका 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !