एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे येथे ६ जणांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील डहाणूकर कॉलनी येथे १६ मे या दिवशी किरकोळ कारणावरून ६ जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली आहे. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. श्रीनिवास वत्सलावर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांच्या आत अलंकार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी कर्वेनगर येथे श्रीनिवास आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झालेला होता अन् त्याचाच सूड घेण्यासाठी आरोपींनी श्रीनिवासचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून हत्या केली. श्रीनिवाससह असणारा त्याचा एक मित्र तेथून पळून गेला; मात्र श्रीनिवास तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला जवळपास असणार्‍या खासगी रुग्णालयात नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले.

संपादकीय भूमिका : 

  • तरुणांचे गुन्हेगारीकडे वळणे थांबण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेणे आवश्यक !
  • किरकोळ हत्या कारणावरून होणे, हे तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे द्योतक आहे. मागील काही दिवसांपासून पुणे येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे, कोयता गँगची दहशत, इसिसचे आतंकवादी सापडणे यांमुळे  पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते !