Assam Bangladeshi Infiltrators : आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष आणि न्यायदंडाधिकारी बनतात !

  • आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची धक्कादायक माहिती !

  • १२६ पैकी ४० आमदार हे बांगलादेशी घुसखोर !

  • आसाममध्ये रहातात १ कोटी २५ लाख बांगलादेशी घुसखोर !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

गौहत्ती – आसाममध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १ कोटी २५ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि १२६ पैकी ४० आमदार हे घुसखोर आहेत. राज्यात बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष, न्यायदंडाधिकारी इत्यादी बनतात, अशी धक्कादायक माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी झारखंडमधील रांची येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. त्यांच्या या विधानामुळे आसाममध्ये वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशी घुसखोर झारखंडमधील आदिवासींसाठी धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘आसाममध्ये बांगलादेशातून ४० वर्षांपूर्वी घुसखोरी चालू झाली. आता आसाममध्ये घुसखोरांची संख्या १ कोटी २५ लाख आहे. राज्यात ही फार मोठी समस्या बनली आहे आणि आसामी लोक त्यांची ओळख गमावून बसले आहेत. आमच्यासारख्या चुका झारखंडमध्ये करू नका. ४० वर्षांपूर्वी आम्ही चूक केली. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण केले नाही. तुम्ही रोहिंग्यांना येऊ देऊ नका. बंगाल आणि आसाम यांनी चुका केल्या. त्या वेळी जे करायला हवे होते, ते आम्ही करू शकलो नाही.’’

काँग्रेस आणि ए.आय.यु.डी.एफ्. या पक्षांकडून मुख्यमत्र्यांवर टीका !

मुख्यमंत्री सरमा यांच्या विधानांनंतर मुसलमानांचे नेते आणि ‘ए.आय.यु.डी.एफ्.’ या पक्षाचे  सरचिटणीस अमिनुल इस्लाम यांनी मुख्यमंत्री सरमा यांचे हे दावे फेटाळून लावत सरमा हे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही विधाने करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह यांनीही सरमा यांच्या विधानांवर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यानंतर ६ दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने देशांच्या सीमांचे रक्षण केले नाही आणि त्यामुळे घुसखोरी झाली, ही वस्तूस्थिती आहे. हा काँग्रेसचा अक्षम्य अपराध आहे !