प्रेमळ आणि धर्माचरण करणारी ठाणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मुक्ता पेंढारकर ही या पिढीतील एक आहे !

वैशाख शुक्ल नवमी (१७.५.२०२४) या दिवशी ठाणे येथील कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.५.२०२४)  

कु. मुक्ता पेंढारकर

कु. मुक्ता प्रसाद पेंढारकर हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘मुक्ता सांगितलेली गोष्ट लगेच कृतीत आणते. ती कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही.

२. इतरांची काळजी घेणे

अ. कधी तिच्या आजी-आजोबांचे हात-पाय दुखत असल्यास ती त्यांची प्रेमाने विचारपूस करते आणि त्यांचे हात-पाय चेपते.

आ. तिचे आजोबा रुग्णाईत असतांना तिने आजोबांची पुष्कळ सेवा केली. त्यांनी कधीही हाक मारली, तरी ती त्यांच्या सेवेला जात असे.

३. ती प्रत्येक रविवारी बालसत्संगाला जाते. बालसत्संगामध्ये सांगितलेली सूत्रे ती स्वतः कृतीत आणण्याचा प्रयत्न करते आणि इतरांनाही सांगते.

श्री. प्रसाद पेंढारकर

४. धर्माचरण करणे

मुक्ता नियमितपणे देवतांचे श्लोक आणि स्तोत्रे म्हणते. ती कुलदेवी, गणपति आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करते. ती स्नान करण्यापूर्वी जलदेवतेला आणि जेवणापूर्वी अन्नपूर्णामातेला प्रार्थना करते. आम्ही प्रार्थना करण्यास विसरलो, तर ती आम्हाला त्याची आठवण करून देते.

५. सात्त्विकतेची ओढ

मुक्ताला सात्त्विक अलंकार परिधान करायला आवडतात, तसेच तिला रांगोळी काढायला आवडते. तिला हिंदु धर्मशास्त्रानुसार वाढदिवस साजरा करायला आवडतो. मुक्ताला दूरचित्रवाहिन्यांवरील ‘रामायण’, ‘भक्त प्रल्हाद’, या मालिका पहायला आवडते. भक्त प्रल्हादाने जशी नारायणाची भक्ती केली, तशी तिलाही भक्ती करावीशी वाटते.

६. ती दिवसातून ३ – ४ वेळा उदबत्ती, कापूर, अत्तर आणि मीठ-पाणी यांचे उपाय करते. ती नामजप करूनच शाळेत जाते.

७. सेवेची आवड

ती मला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेत साहाय्य करते. तिला सेवा करतांना आनंद मिळतो आणि चैतन्य जाणवते.

८. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

२५.६.२०२३ या दिवशी तिच्या आजोबांचे देहावसान झाले. तेव्हा ती शांत आणि स्थिर होती. तिला वातावरणामध्ये चैतन्य जाणवत होते. (‘तिच्या आजोबांच्या ((कै.) डॉ. रमेश पेंढारकर यांच्या) मृत्यूनंतर त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)

९. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे

मुक्ता भावजागृतीचे विविध प्रयोग करते, उदा. श्रीकृष्ण किंवा कुलदेवता यांची मानसपूजा करणे, श्रीकृष्णाशी बोलणे, श्री महालक्ष्मीदेवीच्या चित्राकडे एकटक बघणे, परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे इत्यादी.

१०. सेवाकेंद्रात गेल्यावर तिला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवते.’ 

‘आम्हाला सात्त्विक पाल्याचे पालक होण्याची संधी दिली’, याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.’

– श्री. प्रसाद रमेश पेंढारकर (कु. मुक्ता हिचे वडील), ठाणे
(१.१२.२०२३)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक