धन्य धन्य सीतामाऊली, कल्पतरूची ती सावली ।

आज १७.५.२०२४ या दिवशी सीतानवमी आहे. त्या निमित्ताने …

‘१७.५.२०२४ या दिवशी सीतानवमी आहे. सीतामातेच्या चरणी भावपूर्ण नमस्कार करूया आणि या काव्यातून आपण तिची गुणवैशिष्ट्ये पाहूया. ‘आमच्यावर सीतामातेची कृपादृष्टी होऊ दे आणि आम्हाला तिचे गुण आत्मसात करता येऊ दे’, अशी तिला प्रार्थना करूया.

राम-हनुमान

सीताजन्माची अद्भुत कथा, शेत नांगरतांना सापडली सीता ।
विदेहराज तिचे पिता अन् राणी सुनयना तिची माता ।। १ ।।

काळ सरला पहाता पहाता, मोठी झाली बालसीता ।
जनकनंदिनी सुंदर सीता, शालीनतेची जणू सरिता ।। २ ।।

मृदू वाणी, सात्त्विक रहाणी, साधी सोज्वळ सीताराणी ।
शुद्ध आचरण, विनम्र वर्तन, निर्लाेभी अन् निर्मळ अंतर्मन ।। ३ ।।

मैथिलीचे स्वयंवर रचले, विश्वामित्रासह राम-लक्ष्मण आले ।
श्रीरामाने सीतेला पाहिले अन् परस्परांशी असलेले दैवी नाते स्मरले ।। ४ ।।

रामाने शिवधनुष्य उचलले, जानकीने रामाला वरले ।
लक्ष्मीला श्रीविष्णु लाभले, त्रिभुवन आनंदित झाले ।। ५ ।।

रामासह सप्तपदी चालली, सोनपावलाने लक्ष्मी आली ।
पत्नीची कर्तव्ये पूर्ण केली, अयोध्येत सुखाने नांदू लागली ।। ६ ।।

कैकेयीने रामास वनवास सांगितला, प्रभु श्रीरामाने तो आनंदाने स्वीकारला ।
दशरथास पश्चात्ताप झाला, दु:खाने त्याचा जीव विव्हळला ।। ७ ।।

‘नका जाऊ मला सोडून, तुम्हाविण व्यर्थ मम जीवन’ ।
जानकीचे वचन ऐकून, प्रभु श्रीरामांना करुणा आली दाटून ।। ८ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

लक्ष्मणाने क्रोध आवरून, उर्मिलेचा त्याग करून ।
राम निघाले राज्य सोडून, संगे लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन ।। ९ ।।

सीतेने अनेक संकटे झेलली, वनातही पतीची सेवा केली ।
सुख-दुःखात साथ दिली, रामाशी पूर्णपणे एकरूप झाली ।। १० ।।

भिक्षुक वेशात आला रावण, त्याने केले सीतेचे अपहरण ।
सीतेचे ऐकूनी करुण क्रंदन, जटायूने केले प्रयाण ।। ११ ।।

रावणाशी झुंज देऊन, जटायूने केले धर्माचरण ।
रावणाने पंख कापून, जटायूला दिले भूमीकडे फेकून ।। १२ ।।

सीतेला जाळ्यात फसवले, रावणाने तिला पळवून लंकेत नेले ।
तिने लंकेचे वैभव लाथाडले अन् रावणाचा विवाह प्रस्तावही नाकारला ।। १३ ।।

सीता रामासाठी तळमळत होती, व्याकुळतेने त्याला आळवत होती ।
अनंत यातना सोसत होती, क्षणोक्षणी रामनाम स्मरत होती ।। १४ ।।

पातिव्रत्यापुढे रावण हरला, राम-रावण युद्धात श्रीरामाचा विजय झाला ।
वानरसेनेला हर्ष झाला, रामनामाचा निनाद आसमंतात घुमला ।। १५ ।।

रामाने सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त केले; परंतु तिची अग्नीपरीक्षा घेतली ।
त्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली, रामाने निष्कलंक सीता स्वीकारली ।। १६ ।।

सीतेसह राम अयोध्येला आला, प्रजेला पाहून सारे दुःख विसरला ।
राम अयोध्येचा राजा झाला, सीतेसह गृहस्थ जीवनात रमला ।। १७ ।।

दांपत्याने सुख अनुभवले, सीतेला डोहाळे लागले ।
सुखाला पुन्हा ग्रहण लागले, परिटाने सीतेवर आरोप केले ।। १८ ।।

रामाला राजधर्माने हतबल केले, त्याने सीतेला वनात पाठवले ।
वाल्मीकिऋषींनी तिला स्वीकारले अन् आश्रमात लव-कुश जन्मले ।। १९ ।।

सीतेने पुत्रांना प्रेमाने वाढवले, दोघांवर सुसंस्कार केले ।
यथासमयी सीतेला श्रीराम भेटले, पित्याकडे दोन्ही पुत्र सोपवले ।। २० ।।

प्रजेने सीतेवर लांच्छन लावले, शुद्धतेचे प्रमाण मागितले ।
सीतेने भूदेवीचे आवाहन केले, भूदेवीने प्रगट होऊन प्रमाण दिले ।। २१ ।।

सीता भूमातेत सामावली, लीला संपवून वैकुंठात गेली ।
धन्य धन्य सीतामाऊली । कल्पतरूची ती सावली ।। २२ ।।

तिची महती कुणा न समजली, प्रजेने तिची उपेक्षा केली ।
जेव्हा प्रजेला चूक उमजली, तेव्हा वेळ निघून गेली ।। २३ ।।

धन्य सीतेची सहनशक्ती, धन्य तिची क्षमावृत्ती ।
धन्य सीतेची अलोट प्रीती, धन्य तिची रामभक्ती ।। २४ ।।

पातिव्रत्याची साक्षात् मूर्ती, त्रिभुवनात असे तिची कीर्ती ।
भव्य असे तिची विभूती आणि दिव्य असे तिची अनुभूती ।। २५ ।।

राजा जनकाची नंदिनी, प्रभु श्रीरामाची झाली अर्धांगिनी ।
लव-कुशांची ती जननी, महालक्ष्मीस्वरूपी जगद्जननी ।। २६ ।।

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक