Dubai Unlocked Report : दुबईत ३० सहस्र भारतियांची मालमत्ता !

‘दुबई अनलॉक’ या अहवालातील माहिती

पाकिस्तानी राजकारणी आणि सैन्य अधिकारी यांचीही मोठ्या प्रमाणात मालमत्ता !

अबुधाबी (संयुक्त अरब अमिराती) – ‘दुबई अनलॉक’ नावाचा एक अहवाल समोर आला आहे. यानुसार दुबईमध्ये भारतियांची सर्वाधिक मालमत्ता आहे. यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो. जागतिक शोध पत्रकारिता प्रकल्प असलेल्या ‘दुबई अनलॉक’च्या अहवालातील आकडेवारीनुसार २९ सहस्र ७०० भारतियांनी येथे मालमत्ता खरेदी केली असून त्यांच्याकडे एकूण ३५ सहस्र मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे अनुमाने मूल्य १७ अब्ज अमेरिकी डॉलर, म्हणजे १ लाख ४१ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे.

दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट असली, तरी पाकिस्तानात श्रीमंतांची कमतरता नाही. दुबईत त्यांचे आलिशान बंगले आहेत. पाकिस्तानी लोकांच्या संपत्तीचे मूल्य अनुमाने ११ अब्ज डॉलर, म्हणजे ९१ सहस्र ८५६ कोटी रुपये एवढे आहे.

१७ सहस्र पाकिस्तानी लोकांकडे २३ सहस्र मालमत्ता आहेत. या अहवालात वर्ष २०२० ते २०२२ पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश आहे.

दुबईतील भूमी खरेदी-विक्री व्यवसायात (‘रिअल इस्टेट’मध्ये) गेल्या काही दशकांत मोठी भर पडली आहे. हा अहवाल सांगतो की, जगभरातील असे लोक ज्यांच्यावर जागतिक निर्बंध आणि ‘मनी लाँड्रिंग’चे (पैशांच्या अफरातफरीचे) आरोप आहेत, त्यांनी येथील मालमत्तेत गुंतवणूक केली आहे; परंतु याचा अर्थ असा नाही की, दुबईत गुंतवणूक करणार्‍या प्रत्येकाकडे काळा पैसा आहे. यासह ‘या अहवालात नाव असणे, हा आर्थिक फसवणुकीचा पुरावा असू शकत नाही’, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. न्यूयॉर्क आणि लंडन येथेही काळा पैसा गुंतवला जातो; पण पाश्‍चत्त्य देशांतील निर्बंधांमुळे धोका असलेले लोक दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास प्राधान्य देतात, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील काळ्या पैशांचा भस्मासुर !

भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत १० पटींहून अधिक आहे. जर या अहवालानुसार दुबईतील सर्व गुंतवणूक काळ्या पैशांतूनच करण्यात आल्याचे गृहीत धरले, तर पाकिस्तानातील हा काळा पैसा भारताच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के आहे. यातून पाकिस्तानातील काळ्या पैशांचा नि भ्रष्टाचाराचा अनुमान लावता येऊ शकतो.

या पाकिस्तानी नेत्यांची आहेत अहवालात नावे !

१. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे कुटुंब
२. दिवंगत पाकिस्तानी जनरल परवेझ मुशर्रफ
३. माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो
४. असिफा भुट्टो

संपादकीय भूमिका 

पाश्‍चात्त्य देशांच्या तुलनेत दुबईत काळा पैसा गुंतवणे सोपे असल्याने भारतीय त्यांचा काळा पैसा भूमी खरेदी करण्यासाठी वापरत असणार, ही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही ! ‘ईडी’ने आता यासंदर्भातील माहिती काढून दोषी भारतियांवरही कारवाई केली पाहिजे !