Goa OCI Card Issue : प्रवासी भारतीय नागरिकत्व कार्डचा प्रश्न पुन्हा चर्चेत !

  • ‘ओ.सी.आय.’ कार्ड नोंदणीसाठी पारपत्र रहित केल्याचे प्रमाणपत्र

  • स्वीकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे

पणजी, १२ मे (वार्ता.) : प्रवासी भारतीय नागरिकत्व (‘ओ.सी.आय.’) कार्ड नोंदणीसाठी पारपत्र रहित केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. परराष्ट्र्र मंत्रालयाने याविषयी माहिती देणारे एक शुद्धीपत्र (corrigendum) ३० एप्रिल या दिवशी प्रसिद्ध केले आहे. यामुळे ‘ओ.सी.आय.’ कार्डचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने ४ एप्रिल २०२४ या दिवशी एका कार्यालयीन निवेदनाद्वारे मंत्रालय ‘ओ.सी.आय.’ कार्डच्या नोंदणीसाठी पारपत्र रहित केल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरणार असल्याचे म्हटले होते; मात्र ३० एप्रिल या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. ‘ओ.सी.आय.’कार्डचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट (दाखल) झाला होता. यासंबंधी २ याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट झाल्या होत्या. उच्च न्यायालयाने ६ मे या दिवशी ‘ओ.सी.आय.’ कार्डसंबंधी परराष्ट्र मंत्रालयाच्या ४ एप्रिल या दिवशीच्या कार्यालयीन निवेदनाच्या आधारावर दोन्ही याचिका निकाली काढल्या होत्या; मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन शुद्धीपत्रामुळे ‘ओ.सी.आय.’ कार्डसंबंधी अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत.