S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीरविषयी देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्ष तो परत मिळवण्यासाठी कटीबद्ध आहे. ही आपली राष्ट्रीय बांधीलकी आहे. पाकव्याप्त काश्मीरविषयी देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, असे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकव्याप्त काश्मीरविषयी वक्तव्य केले होते. ‘भारताला तेथे काहीही करण्याची आवश्यकता नाही. पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांचीच तशी इच्छा असून तो भाग आपोआप भारतात समाविष्ट होईल’, असे म्हटले होते.

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की …

१. भारतियांना वाटत होते की, कलम ३७० कधीच रहित होणार नाही; परंतु भाजप सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये ते रहित केले. आज पाकव्याप्त काश्मीर भारतात परत समाविष्ट व्हावा, असे देशवासियांना वाटत आहे. नागरिकांची ही इच्छाही नक्कीच पूर्ण होईल.

२. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. तेथील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी राजकीय पक्ष आणि मानवाधिकार संघटना यांनी मोर्चा काढला होता. तसेच ११ मे या दिवशी तेथील मुझफ्फराबादमध्ये धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.