१० मे २०२४ या दिवशी ‘१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरामध्ये लखनौचा मौलवी अहमदशहा, अयोध्येची कर्तबगार हजरत महाल बेगम, जगदीशपूरचे कुमारसिंह, अमरसिंह इत्यादींनी अहमहमिकेने भाग घेतला असला, तसेच देहलीचा बादशहा बहादूरशहा जाफर याच्याकडे लढ्याचे तांत्रिक नेतृत्व देण्यात आले असले, तरी तिचे प्रणेते नानासाहेब पेशवे हे होते. अझीमुल्लाखान, रावसाहेब पेशवे हे त्यांचे सहकारी होते. नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या त्रिवर्गाचाच स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग प्रमुख असून त्यांनी अतुलनीय पराक्रम करून दिगंत कीर्ती मिळवली, हा इतिहासाचा निर्वाळा आहे.
वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ज्या ३ प्रमुख क्रांतीनेत्यांनी सर्वांत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या त्या, म्हणजे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी रणरागिणी लक्ष्मीबाई आणि सेनापती तात्या टोपे. नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावरील हा अभ्यासपूर्ण लेख १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या निमित्ताने आवर्जून प्रकाशित करत आहोत.
१. नानासाहेबांनी गुप्त संघटनांद्वारे केलेले कार्य
क्रांतीचे वारे हिंदुस्थानभर वाहू लागले. त्यापूर्वीच ब्रह्मावर्तामध्ये स्वातंत्र्ययुद्ध होणार, हे जाणून ते यशस्वी होण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी सुसंघटित जुळणी करण्यासाठी एक गुप्त संघटना कार्यान्वित झालेली होती. तिचे प्रणेते नानासाहेब पेशवे असून रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, अझीमुल्लाखान इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते, तर मुत्सद्दीपणे लढ्याचे तांत्रिक नेतृत्व देहलीचा कवीवृत्तीचा वृद्ध बादशहा बहादूरशहा जाफर यांना बहाल करण्यात आले होते.
नानासाहेबांनी देशपरिस्थितीचे प्रथम समग्र आकलन करून त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करून अल्पावधीत कार्याला आरंभ केला. वर्ष १८५६ च्या थोडे आधी या स्वातंत्र्ययुद्धाच्या राजकीय ध्येयाची लोकांना दीक्षा देण्यासाठी प्रथम नानासाहेबांनी पंडित, फकीर इत्यादींच्या वेशात देशभर प्रचारक पाठवले. ठिकठिकाणच्या लष्करी तुकड्यांनाही इंग्रजांना पत्ता लागू न देता शिताफीने गुप्त प्रचार मोठ्या प्रमाणावर होत होता. एवढेच नव्हे, तर देहली, अयोध्येचा नवाब, बुंदेलखंडातील राजे, दक्षिणेतील पटवर्धन संस्थाने, कोल्हापूर, नळदुर्ग, बेळगाव, मैसूर इत्यादी ठिकाणच्या संस्थानातील दरबारी क्रांतीयुद्धात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी नानासाहेब पेशवे यांनी आपल्या अत्यंत विश्वासू माणसांना गुप्त संदेश देऊन रवाना केले. मैसूर दरबाराकडे पाठवण्यात आलेल्या नानांच्या एका राजदूताला इंग्रजांनी अटक केल्याचेही वृत्त होते; पण त्याचा अधिक गवगवा झाला नाही.
एप्रिल १९५७ च्या शेवटी नानासाहेब आणि अझीमुल्लाखान हे दोघे ठिकठिकाणच्या गुप्त संस्थांच्या केंद्रात संघटनात्मक ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख नगरांना भेटी देण्यासाठी जाऊन आले. वर्ष १८५७ या पूर्वनियोजित सार्वत्रिक उठावाच्या दिवसाची प्रतीक्षा करत असतांना १५ मेच्या सुमारास मीरतच्या आकस्मिक उठावाची आणि पाठोपाठ देहलीच्या मुक्ततेच्या बातम्या कानपुरात येऊन पोचल्या. बरीच चर्चा होऊन तात्काळ देहलीचा मार्ग अनुसरण्याऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पहाण्याचा निर्णय होऊन उभयतांनी कानपूरकडे कूच केले.
२. वर्ष १८५७ च्या क्रांतीयुद्धात पराभव होण्यामागील कारणे
वर्ष १८५७ चा भीषण रणसंग्राम चालू झाला. देहली, संयुक्त प्रांत, रोहिलखंड, बुंदेलखंड, मध्य भारत, बिहार, बंगाल एवढ्या विस्तृत प्रदेशात लढवल्या गेलेल्या अनेक लढायांमध्ये झाशीची राणी, तात्या टोपे, कुमारसिंह, मौलवी अहमदशहा इत्यादी नामवंतांसमवेत सहस्रो क्रांतीवीर आणि देशभक्त यांनी अतुलनीय पराक्रम गाजवले. तरी शेवटी या क्रांतीयुद्धात पराभव होण्यास अनेक कारणे आहेत. इंग्रजांविरुद्ध मोठा असंतोष सर्वत्र खदखदत होता; पण तो संघटित होऊ शकला नाही. क्रांतीकारकांकडे सैन्य भरपूर होते; पण शिस्तीचा अभाव, कचखाऊपणा, विस्कळीतपणा होता. फितुरी पाचवीला पुजली होती. ग्वाल्हेरचे जयाजी शिंदे इंग्रजांचे साहाय्यक (मदतनीस) होते, तर शीख, गुरखा आणि मद्रासी हिंदी शिपायांच्या पराक्रमाच्या जोरावरच इंग्रजांनी क्रांतीकारकांचा बीमोड केला. हा कटू इतिहास सर्वश्रुत आहे
३. नानासाहेबांनी नेपाळ राजे जंग बहाद्दूर यांना केलेली विनंती अन् इंग्रज सेनापती होप ग्रँट याला दिलेले बाणेदार उत्तर !
वर्ष १८५७ च्या प्रत्यक्ष क्रांतीयुद्धात नानासाहेबांचे सूत्रसंचालन फार मोठ्या प्रमाणावर असल्याचे अनेक इतिहासकारांचे मत आहे आणि तशी प्रत्यक्ष इतिहासाची साक्षही आहे. क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात इंग्रजी सैन्याच्या कह्यात रोहिलखंड वगळता अन्य बहुतेक मुलुख आला होता. रोहिलखंडात काेंडल्या गेलेल्या क्रांतीनेत्यांचा आणि सहस्रो क्रांतीकारकांचा जीवघेणा पाठलाग अन् लांडगेतोड अविरत चालू होती. तात्या टोपे यांची कायमची ताटातूट झाली होती. शेवटी नानासाहेब, बाळासाहेब, अयोध्येची बेगम अन् तिचा मुलगा यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ ६० सहस्र क्रांतीकारक नेपाळमध्ये शिरले. नेपाळच्या जंग बहाद्दूराने नानासाहेबांना एक पत्र लिहिले.
नानासाहेबांनी त्या पत्राला अत्यंत प्रभावी उत्तर पाठवले. त्यामध्ये ‘नेपाळच्या ‘हिंदु राष्ट्रा’च्या पराक्रमाचा उल्लेख करून स्वराज्य आणि स्वधर्मासाठी लढणार्या अन् त्यांच्या नाशाला टपलेल्या परकीय इंग्रजांना साहाय्य करू नये. उलट तुमच्या अधिपत्याखाली पुन्हा लढा उभारण्यास आणि त्यात जिंकलेला सर्व मुलुख तुमच्या हवाली करण्यासही आम्ही सिद्ध आहोत. तेही शक्य नसल्यास आम्हाला आश्रय तरी द्यावा’, असे परोपरीने विनवले; पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. जंग बहाद्दूराने आश्रय, तसेच इंग्रजांपासून अभय देण्यात स्वतःची असमर्थता व्यक्त केली. त्यापूर्वी नानासाहेबांनी इंग्रज सेनापती होप ग्रँट याला एका ऐतिहासिक महत्त्वाचे पत्र लिहिले होते. त्यात ब्रिटिशांच्या अन्याय्य राजवटीचा कडकडून निषेध केल्यावर ते विचारतात, ‘हिंदुस्थान बळकावून मला बंडखोर ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे ? हिंदुस्थानवर राज्य करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? परके फिरंगी तुम्ही या देशाचे राजे नि या आमच्या देशात आम्ही तेवढे चोर ठरतो काय ?’ दारुण पराभवातही हे तेजस्वी उद्गार कडव्या देशभक्तालाच शोभून दिसण्यासारखे आहेत.
नानासाहेब पेशवे यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तपणे नैमिषारण्यात राहून शेवटपर्यंत साधना करणे
नानासाहेब पेशवे यांचे पुढे नक्की काय झाले ? हे इतिहासाला अज्ञात आहे. यासंदर्भात पू. (प्रा.) के.वि. बेलसरे लिखित ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज – चरित्र आणि वाङ्मय’ या ग्रंथात ५५ आणि ५६ या पानांवर विस्मयजनक विलक्षण हकिकत आढळते. ती अशी,
‘श्री महाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) २ वर्षे नैमिषारण्यात राहिले होते. त्या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडून आली. ती म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय होय. वर्ष १८५८-५९ मध्ये हिंदी फौजांचा बीमोड होऊन नानासाहेबांना स्वतःची मंडळी घेऊन हिंदुस्थान सोडून जाणे भाग पडले. पहिल्यांदा ते नेपाळमध्ये तेथील राजाच्या संमतीने गेले; पण इंग्रजांनी दडपण आणल्यामुळे त्यांना तेथूनही निघून जाणे भाग पडले. राघोबा नावाच्या एका विश्वासू नोकराला घेऊन ते नैमिषारण्यात शिरले आणि गुप्तपणे रहाण्यासाठी आश्रय शोधत असतांना त्यांची गाठ श्री महाराजांशी पडली. आपल्या गुहेच्या जवळच; पण आणखी आतमध्ये असलेली एक मोठी गुहा त्यांना वस्तीला दिली. त्यांना गुप्ततेचे आणि नियमितपणे भेटण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे वर्ष १८६० ते १९०६ या कालावधीत नानासाहेबांचा अंत होईपर्यंत मोठमोठ्या तपस्वींच्या दर्शनाच्या मिषाने गोंदवलेकर महाराज त्यांना भेटायला नियमितपणे जात असत. स्वतःचे राज्य गमावून गुहेमध्ये अज्ञातवासात वैराग्याच्या वेशात रहाणारे नानासाहेब फार खिन्नमनस्क असत. श्री महाराजांनी त्यांना खडतर प्रारब्धयोग समजावून दीर्घ प्रयत्नांनी अध्यात्म मार्गाला लावले. नानासाहेबांना हे पटल्यावर मनःशांती लाभून ते परमार्थ मार्गातही जप, ज्ञानेश्वरी, दासबोध यांचे वाचन आणि चिंतन यांतून पुष्कळ पुढे गेले.
– यशवंत जोगळेकर
४. नानासाहेबांना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी बक्षीस घोषित करणे
नेपाळच्या राजाकडून प्रतिसाद मिळाला नसला, तरी नानासाहेब अनेक क्रांतीकारकांसह दुसरा पर्यायच नसल्यामुळे नेपाळमध्ये प्रवेश करून निसटले; पण त्यानंतरही ते पुन्हा प्रकट होणार’, अशी पुण्यातील बर्याच मंडळींची कल्पना होती आणि तीच मोठी धास्ती इंग्रजांनाही वाटत होती; म्हणूनच नानासाहेब पेशवे यांना पकडून देणार्याला इंग्रज सरकारने आरंभीला ५० सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. पुढे ते १ लाख रुपयांपर्यंत वाढवले होते.
इंग्रजांशी अखेरपर्यंत झुंजून देशोधडीला लागलेल्या आणि वनातून कष्टमय जीवन कंठणार्या या थोर क्रांतीनेत्याला विनम्र अभिवादन !’
– यशवंत जोगळेकर, नौपाडा, ठाणे (पश्चिम)
(साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, २६ सप्टेंबर २००६)