नागपूर – लोकसभा निवडणुकीत मोठा घातपात घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी नक्षलवाद्यांनी टिपागड परिसरातील एका डोंगरावरील भूमीत पुरून ठेवलेली स्फोटके आणि ‘क्लेमोर माईन्स’ (भूदल किंवा वाहने यांवर आक्रमण करणारे एक प्रकारची स्फोटके) नष्ट केली. यामुळे मोठा धोका टळला आहे.
नक्षलवाद्यांनी स्फोटके आणि क्लेमोर माईन्स भूमीत पुरून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी त्या भागात शोधमोहीम राबवली. तिथे सुरक्षा दल नेमण्यात आले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांना त्या वेळी या क्लेमोर किंवा स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. ६ मे या दिवशी सकाळी पथके घटनास्थळी पोचली, तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ६ प्रेशर कुकर, स्फोटके आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले ३ ‘क्लेमोर पाईप’ सापडले.
पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. बाँब शोधक आणि नाशक पथकाच्या साहाय्याने स्फोटके घटनास्थळी नष्ट करण्यात आली. उर्वरित साहित्य घटनास्थळीच जळून खाक झाले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिकानक्षलवाद्यांचा कायमस्वरूपी बीमोड कधी होणार ? |