७ मे या दिवशी मतदान, ४ जूनला निकाल
सिंधुदुर्ग – लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून चालू असलेल्या प्रचाराची ५ मे या दिवशी सांगता झाली. या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडीतील ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने’चे उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात होणार आहे. सभा, प्रचारफेर्या, घरोघरी प्रचार, असा सार्वजनिकरित्या होणारा प्रसार थांबला, असला तरी आता छुप्या प्रसाराला वेग येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यासाठी ७ मे या दिवशी मतदान होणार आहे. राऊत आणि राणे यांच्या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाचे सुरेंद्र शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे मारुतिकाका जोयशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, तसेच शकील सावंत, अमृत तांबडे आणि विनायक लहू राऊत हे ३ अपक्ष मिळून एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे.
या मतदारसंघात विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा झाल्या, तसेच नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदींच्या सभा झाल्या.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेली काही वर्षे काँग्रेसची ‘हात’ आणि शिवसेनेची ‘धनुष्यबाण’ ही निशाणी यांवर निवडणूक लढवली गेली होती; मात्र या मतदारसंघात शिवसेनेचा वरचश्मा राहिल्याने ‘धनुष्यबाण’ ही निशाणी घराघरात आणि मनामनात रुजली आहे; मात्र २०२४ च्या या निवडणुकीत चित्र पालटले आहे. शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. ठाकरे गटाचे विनायक राऊत ‘मशाल’ या चिन्हावर येथे निवडणूक लढवत आहेत. महायुतीतील शिवसेनेला (शिंदे गटाला) उमेदवारी न मिळता भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे.
विनायक राऊत या मतदारसंघातून यापूर्वी २ वेळा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. याउलट नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत एकदा कुडाळ मतदारसंघातून आणि एकदा मुंबई येथे मतदारसंघातून, असा २ वेळा पराभव झाला आहे. आता राणे हे लोकसभा निवडणूक लढवत असल्याने ते राऊत यांची विजयी परंपरा रोखतात कि राऊत हे राणे यांची पराभवाची परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी होतात ? हे पहावे लागणार आहे.
आम्हीच जिंकणार !
५ मे या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवार असलेले महायुतीचे नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा, पत्रकार परिषद, वाहनफेर्या आणि घरोघर प्रसार करण्यावर जोर देण्यात आला. सावंतवाडी येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि नारायण राणे यांची सार्वजनिक सभा झाली. सांगेली येथे वाहनफेरी काढण्यात आली. विनायक राऊत आणि महायुतीचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे यांच्या पत्नी साै. निलम राणे यांनी प्रचाराच्या मैदानात उतरून गावागावांत बैठका घेतल्या. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून प्रचाराच्या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ‘दोघांकडून आमचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार’, असा विश्वास व्यक्त केला.