कोकणचा विकास पर्यटनातून शक्य ! –  राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे


कणकवली – कोकणाचा प्रदेश जैवविविधतेने नटलेला आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत सुंदर प्रदेश आहे. कारखाने सोडा केवळ हॉटेल आणि इंग्रजी बोलण्याच्या शिकवण्या येथे चालू केल्या, तरी येथील विकासाला चालना मिळेल. कोकणात उद्योग आले, तर येथील लोकांना रोजगारासाठी कोकण सोडावे लागणार नाही. कुटुंबापासून दूर व्हावे लागणार नाही. कोकणचा विकास पर्यटनातून शक्य आहे. कोकणचा विकास व्हायचा असेल, तर  नारायण राणे यांच्यासारख्या अभ्यासू खासदाराला विजयी करा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सार्वजनिक सभा ४ मे या दिवशी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर झाली. या  वेळी राज ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘नारायण राणे यांच्या कामाचे कौतुक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करत होते. मीही त्यांच्या कामाचा सपाटा पाहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून ३७० कलम हटवले. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा मुलायसिंह  सरकारने कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून दिली. तो बाबर आणि त्याला सांभाळणारे आजही आपल्याकडे आहेत, हे दुर्दैव आहे.’’

उद्धव ठाकरे यांना टोला

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, असा आरोप उद्धव ठाकरे करत आहेत; मग या सरकारच्या १० वर्षांच्या काळातील साडेसात वर्षे उद्धव ठाकरे यांच्या समवेतच होते. मग उद्योग गुजरातला गेले कसे ? कोकणात अणूऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ७ अणूऊर्जा प्रकल्प भारतात आहेत. यातील सर्वांत मोठा बीएआर्सीचा प्रकल्प मुंबईतच आहे. त्याच्या विरोधात यांनी कधी आवाज उठवला नाही. कोकणातील प्रकल्पांना विरोध करणार्‍यांची भूमीविषयीची गणिते असतात. लोकांकडून अल्प किमतीत भूमी घ्यायची आणि अधिक किमतीत ती विकायची. हे धंदे करण्यासाठी येथील उद्योगांना प्रारंभी विरोध केला जातो. येथील विद्यमान खासदाराने आतापर्यंत तेच केले. याला आता बळी पडू नका, असे आवाहन ठाकरे यांनी या वेळी केले.

नारायण राणे यांच्यासाठी दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघात ठाण मांडून

सावंतवाडी – नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असलेले; मात्र आता मित्र झालेले महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे लोकसभा निवडणुकीत राणे यांना मताधिक्य मिळावे, यासाठी सावंतवाडी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. गाव, वाडी, वस्ती, व्यापारी, उद्योजक अशा सर्वांशी संपर्क साधून ‘नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’, असे आवाहन ते करत आहेत. या वेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.