सनातन धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना दडपण्याचे कारस्थान ! – डॉ. अमित थढाणी

‘दाभोलकर-पानसरे हत्या, हिंदु संघटनांना कुणी अडकवलंय ?’ या विषयावर प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अमित थढाणी यांची ‘डीजी ९ पॉडकास्ट’ वरील मुलाखत ! 

डॉ. अमित थडानी

‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’, या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अमित थढाणी यांची ‘डीजी ९ पॉडकास्ट’वर ‘दाभोलकर-पानसरे हत्या, हिंदु संघटनांना कुणी अडकवलंय ?’ या विषयावर ही मुलाखत घेण्यात आली. दाभोलकर-पानसरे हत्यांचे खापर मोठ्या शिताफीने हिंदूंवर फोडण्याचा केलेला प्रयत्न काही घटनांमधून सहजपणे दिसून येतो. एकंदरीत घटनाक्रमातून सनातन धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना दडपण्याचे कारस्थान चालू असल्याचे लक्षात येते. सनातनच्या साधकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या अट्टहासापोटी अन्वेषण यंत्रणांनी जमवलेले खोटेनाटे पुरावे, रचलेल्या काल्पनिक कथा, त्यासाठी राबवलेली यंत्रणा अन् घालवलेला वेळ या सर्वांतून अन्वेषणावर निर्माण होणारी अनेक प्रश्नचिन्हे यांविषयी डॉ. अमित थढाणी यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. प्रभाकर सूर्यवंशी

डॉ. अमित थढाणी यांची ही खळबळजनक मुलाखत पुढील लिंकवर पहा !

१. पुस्तक लिहिण्याची संकल्पना !

‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची एका कार्यक्रमात भेट झाल्यावर त्यांच्याकडून या हत्येप्रकरणी जाणून घेतले, तेव्हा या प्रकरणाचा अधिक अभ्यास केला. त्या वेळी अधिवक्ता वीरेंद्र  सांगत असलेल्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, असे लक्षात आले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सर्वप्रथम गुंड विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली; त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आणि दाभोलकर हत्याकांडात वापरलेले पिस्तूल एकच असल्याचा ‘बॅलेस्टिक अहवाल’ पोलिसांना मिळाला होता. दोन्ही गुन्ह्यांतील पिस्तूल एकच असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. असे असूनही आरोपपत्रामध्ये कधीही त्यांचे नाव मारेकरी म्हणून आले नाही. याउलट केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने २ आरोपपत्रे प्रविष्ट केली होती. त्यामधील पहिल्या आरोपपत्रामध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचे नाव होते आणि दुसर्‍या पुरवणी आरोपपत्रामध्ये मारेकरी परत पालटले होते. त्यामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे मारेकरी होते. हे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा माझी ही उत्सुकता वाढली गेली. ‘अन्वेषण यंत्रणांना अन्वेषणच करायचे नसून या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळी दिशा दिली जात आहे का ?’, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.

२. खंडेलवाल आणि नागोरी यांचा जामीन संमत !

या प्रकरणी अटक करण्यात आलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना पुणे पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केले, तेव्हा त्यांनी ‘आम्हाला २५ लाख देण्याची लालूच ‘ए.टी.एस्.’चे (तत्कालीन) प्रमुख राकेश मारिया दाखवत आहेत, गुन्हा मान्य करा, तुमच्या विरोधातील पुरावे कच्चेच ठेवतो, म्हणजे तुम्ही सुटू शकाल’, असे भर न्यायालयात न्यायाधिशांसमोर सांगितले. खंडेलवाल, नागोरी यांना जामीन मिळाला; कारण इतक्याच पुराव्यावर या दोघांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करता येणार नाही’, असे पुणे पोलिसांनी सत्यप्रितज्ञापत्रावर न्यायालयाला सांगितले.

३. सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथामध्ये कोणत्याही प्रकारे हत्येसाठी प्रवृत्त केलेले नाही !

१० सहस्र पानांच्या आरोपपत्राचा अभ्यास करून हे संदर्भ गोळा केले आहेत. आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. कोणतेही पुरावे नाहीत, मी लिहिलेले पुस्तक वाचताच वाचकांच्या हे सहज लक्षात येईल. त्यांच्या मते या हत्या सनातनचा ग्रंथ ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकावरून प्रेरित होऊन केल्या आहेत; पण या ग्रंथामध्ये कोणत्याही प्रकारे हत्येसाठी प्रवृत्त केलेले नाही. क्षात्रधर्म साधना या ग्रंथामध्ये दिलेला अर्थ हिंसक कृती असा नसून भ्रष्टाचार, बलात्कार, अन्याय पाहून गप्प बसणार्‍या समाजाला अलीकडच्या अवतारांची, क्रांतीकारकांची उदाहरणे देऊन जागृत करण्याचा प्रयत्न आहे; पण या पुस्तकातील काही विशिष्ट वाक्यांना अपेक्षित अर्थ लावून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने स्वत:ला अपेक्षित असे मांडले आहे. सनातनने आजपर्यंत प्रकाशित केलेल्या सहस्रो ग्रंथांपैकी केवळ एका पानाचे लेखन सादर करून सनातनची विचारधारा हिंसक असल्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

४. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आत्मा प्लँचेट करून बोलावण्यात आला !

पुणे पोलिसांना कोणतेही आरोपी पुरावे सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी सनातनचे साधक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांना अडकवण्यास चालू केले. सनातनच्या आश्रमावरही धाड टाकली, तिथल्या हार्डडिस्क, ग्रंथ, साधकांचे भ्रमणभाष इत्यादीमध्येही त्यांना काही सापडले नाही. त्या वेळी पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी माध्यमांसमोर स्वतःहून ‘कोणताही मागमूस मिळाला नाही, तसेच कोणताही पुरावा सापडला नाही’, अशी संमती दिली होती. त्यानंतर गुलाबराव पोळ यांनी हत्येच्या अन्वेषणासाठी ‘प्लँचेट’सारख्या तंत्राचा वापर करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आत्मा बोलावला होता.

५. तिन्ही हत्यांमध्ये सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात टप्प्याटप्प्याने आरोपी पालटण्यात आले. पुरावा नसतांना खोटे पुरावे, पुराव्यांचा भास निर्माण करून आरोपपत्रामध्ये असे नमूद करण्यात आले की, या तिन्ही (डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश) हत्यांच्या मागे सनातन संस्था आहे; पण असे कुठेही सिद्ध झालेले नाही. डॉ. तावडे यांच्याकडे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून जप्त केलेल्या ‘संगणकात इ-मेल सापडला’, असा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात तो ई-मेल वर्षे २००७ मधील असून तो त्या वेळच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या संदर्भात होता. (त्यातील कलमे अशी होती ज्याने हिंदु धर्मातील अनेक विधी बंद करावे लागले असते.) त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. यातून हत्येचा कोणताही संबंध सिद्ध होत नाही. याच संगणकाच्या ‘हार्ड डिस्क’मधून काही पुस्तकाच्या धारिका जप्त करण्यात आल्या. या धारिका आणि हत्या यांचा कोणताही संबंध होता, असे सिद्ध होत नाही, म्हणजे ‘केवळ सनातन संस्थेला लक्ष्य करणे’, हाच एक हेतू ठेवून त्यांना अटक करण्यात आली, हेच यातून लक्षात येते. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. याचे अन्वेषण पुणे पोलिसांनी केले होते त्या वेळी त्यांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले.

६. पूर्वग्रहातून सनातन संस्थेला केले ‘लक्ष्य’ !

श्री महालक्ष्मीदेवीचा चांदीचा रथ सिद्ध करण्याचे कंत्राट कोल्हापूर येथील संजय साडविलकर याला मिळाले होते. त्यामध्ये त्याने भ्रष्टाचार केल्याचे आढळून आल्याने शासकीय अधिकार्‍यांनी ‘हे कंत्राट रहित करण्यात यावे’, असा अहवाल सादर केला होता. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात सनातन संस्थेचा हात होता आणि जेव्हा हे अहवाल प्रसिद्ध झाले, तेव्हा एक मासानंतर साडविलकर हा साक्षीदार होतो. पूर्वग्रहातून त्यांनी सनातन संस्थेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, हेच यातून लक्षात येते.

७. हा एक प्रकारचा वैचारिक आतंकवाद !

सनातन आश्रमातील साधकांच्या चौकशीपासून प्रथम मनीष नागोरी-विकास खंडेलवाल, नंतर सारंग अकोलकर-विनय पवार, त्यानंतर समीर गायकवाड-डॉ. वीरेंद्र तावडे आणि अखेर सचिन अंदुरे-शरद कळसकर या जोड्यांपर्यंत आली आहे. दाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळे आजपर्यंत सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांना नाहक अटक करून या प्रकरणात गोवण्यात आले आहे, तसेच हिंदुत्वनिष्ठांचा खटला लढणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करून त्यांना हिंदुत्वनिष्ठांवर दहशत निर्माण करायची होती. त्यांचीही कोणतीच उलट तपासणी झाली नाही आणि त्यांच्या विरोधात एकही पुरावा सापडला नाही. यापुढे ‘आणखी कुणी सापडले आणि तेच मारेकरी होते’, असे म्हटले, तर आता आश्चर्य वाटणार नाही. समाजात जे कुणी सनातन धर्मरक्षणाचे कार्य करतात, त्यांना ‘भगवे आतंकवादी’ असे संबोधून हिंदूंना दडपण्याचे कारस्थान चालू आहे. पोलिसांनी आरोपींची वर्णनानुसार काढलेली पूर्वीची छायाचित्रे आणि त्यानंतर काढलेली छायाचित्रे यांतही बरीच तफावत आढळून येते. ज्या पद्धतीने पकडण्यात आलेले आरोपीही प्रतिवर्षी पालटत गेले, तसेच ही छायाचित्रेही पालटत गेली. त्या आधारावर हा खटला चालवला जातो. त्यावरून हा खटला किती कमकुवत आहे हे लक्षात येते. खरे आरोपी न पकडले गेल्यास सीबीआयसारखी सर्वोच्च अन्वेषण यंत्रणाही कशा प्रकारे अन्यायकारक कृत्ये करते, हे यावरून लक्षात येते.

अंनिसच्या आर्थिक व्यवहारांत मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. डॉ. दाभोलकर यांनी कायद्याचे उल्लंघन करून विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या. त्यांच्या न्यासात प्रचंड आर्थिक घोटाळे झाले आहेत. नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनांच्या सूचीमध्येही त्यांच्या संघटनेचे नाव होते. या गोष्टीही दुर्लक्षून चालणार नाहीत. हा एक प्रकारचा वैचारिक आतंकवाद असून याच्या विरोधात लढणे, हे सर्वांचेच कर्तव्य आहे.