‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !

नागपूर – नागपूर विद्यापिठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या चालू आहेत. ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स’ या अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्रातील २ पेपर विद्यापिठाच्या वेळापत्रकानुसार २ मे या दिवशी होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर दिल्यानुसार विद्यार्थी ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्रावर दिलेल्या वेळेत पोचले; मात्र महाविद्यालयाला याची कल्पना नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठा’ने त्यांना काही कळवले नव्हते. महाविद्यालयाला प्रश्नपत्रिकाही पाठवल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचा आग्रह केला. अंतिमतः विद्यापीठ स्तरावर धावपळ चालू झाली. आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या सूचना विद्यापिठाने दिल्यानंतर ऐन वेळेस केंद्राधिकार्‍यांना परीक्षेची सिद्धता करावी लागली. त्यानंतर विद्यापिठाने संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका केंद्राला पाठवली आणि छापील प्रती विद्यार्थ्यांना देऊन परीक्षा चालू करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

विद्यापिठाचा भोंगळ कारभार !