Reservation on Religion : ‘धर्मावर आधारित आरक्षण, ही संकल्पनाच आम्हाला अमान्य !’ – शरद पवार

कोल्हापूर – धर्मावर आधारित आरक्षण, ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. हे कुणी करणार नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले, तर आम्ही त्या विरोधात उभे राहू. उलट धर्मावर आधारित आरक्षणाचे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातील तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते २ मे या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. ‘वारसा कर’ आणि संपत्तीच्या पुनर्वाटपावरून मोदी यांनी ‘इंडिया’ आघाडीवर आरोप केले आहेत. त्याचा काँग्रेसने घोषणापत्रात उल्लेख केला नाही.

२. मी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून सर्वच पंतप्रधानांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी भेटणे-बोलणे झाले. त्यांची भाषणे ऐकली; परंतु ‘अतृप्त आत्म्या’सारखे शब्द नरेंद्र मोदी वापरतात, तेव्हा त्याच काही आश्‍चर्य नाही; कारण मोदी यांच्या इतकी पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा कुणीच केलेली नाही. (काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांच्या पंतप्रधानांनी ‘देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा’, असे म्हणणे म्हणजे पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा नाही का ? काँग्रेसच्या काळात पंतप्रधानपद म्हणजे केवळ शोभेची बाहुली होती आणि विदेशात भारताला काय पत होती, हे भारतातील नागरिकांना चांगले ठाऊक आहे  ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

वर्ष २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण अल्प करून ते मुसलमानांना दिले होते. आंध्रप्रदेशातही काँग्रसने मुसलमानांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आताही कर्नाटक सरकारचा तोच प्रयत्न करत आहे. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करूनच जो काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राजकारण करतो, त्यांची धर्मांवर आधारित आरक्षणाविषयी अशी भूमिका दुटप्पीच म्हणावी लागेल !