मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग : कारणे, लक्षणे आणि उपचार !

मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक जणांना बर्‍याच प्रमाणात होतांना आपल्याला दिसून येतो. आपल्या शरिराचा विविध जंतूंशी प्रतिदिन संपर्क येतच असतो. आपले शरीर बर्‍याच अंशी या जंतूंशी लढा देत असते; पण कधीतरी हा लढा निष्फळ ठरतो आणि आपल्याला जंतूसंसर्ग होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये होण्याचे प्रमाण अधिक असते. या संसर्गाची लक्षणे समजून घेऊन त्यावर योग्य वेळी औषधोपचार केल्यास आपल्याला वेळीच आजार आटोक्यात आणता येतो. म्हणून आपण या लेखाच्या माध्यमातून विविध आजारांची लक्षणे समजून घेत आहोत. यामध्ये काही उपचार घरी करण्यासारखे साधे, सोपे सांगितलेले आहेत. ते उपचार वैद्यकीय औषधोपचारांसह करावयाचे आहेत. जंतूसंसर्गाविषयी घरगुती उपचारांवर पूर्णपणे अवलंबून रहाणे चुकीचे आहे.

१. मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होण्याची कारणे

अ. पुष्कळ वेळ लघवीचा वेग धरून ठेवणे. लांबच्या प्रवासामध्ये बर्‍याचदा असे आढळून येते की, वेळेत लघवीला जाणे शक्य होत नाही. ही परिस्थिती जंतूंची वाढ होण्यास कारणीभूत ठरते.

आ. शारीरिक स्वच्छतेचा अभाव. विशेषतः स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत योग्य ती स्वच्छता न राखल्यास जंतूसंसर्ग होऊ शकतो.

इ. मधुमेह, शरिरातील पाण्याचे प्रमाण न्यून होणे यांमुळेही मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग होऊ शकतो.

ई. मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग झाल्यानंतर कष्टाने मूत्र प्रवृत्ती होते. अशा प्रकारे थोडी थोडी आणि कष्टाने होणार्‍या मूत्र प्रवृत्तीची कारणे आयुर्वेदात सांगितलेली आहेत. जसे की, आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करणे, अतीमद्यपान करणे, अतीप्रमाणात मासे खाणे इत्यादी.

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

२. लक्षणे 

अ. वारंवार आणि थोडी थोडी मूत्र प्रवृत्ती होणे.

आ. लघवी करतांना जळजळ होणे.

इ. मूत्राला तीव्र गंध येणे.

ई. गडद पिवळ्या रंगाची आणि लालसर लघवी होणे.

उ. लघवी पूर्ण झाली नसल्याचे वाटणे.

ऊ. कधी कधी लघवीतून रक्तही येऊ शकते.

ए. लघवी करतांना वेदना होणे, तसेच कमरेत जांघेतही वेदना होतात.

मूत्र मार्गाचा जंतूसंसर्ग झाला आहे, हे बर्‍याचदा साध्या लघवीच्या तपासणीने निदान होते; परंतु वारंवार जंतूसंसर्ग होत असल्यास त्याचे कारण शोधण्यासाठी वैद्य आपल्याला पुढच्या पुढच्या तपासण्या करण्यास सांगू शकतात. जंतूसंसर्गाची लक्षणे दिसल्यास एक-दोन दिवसांत घरगुती उपचार करूनही आराम न मिळाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

३. मूत्रमार्गाचा जंतूसंसर्ग झाल्यास घ्यावयाची काळजी

अ. ओटीपोटात आणि कमरेत होणार्‍या वेदनासाठी गरम पाण्याच्या पिशवीने शेकू शकतो.

आ. योग्य प्रमाणात पाणी पिणे, नारळ पाणी, लिंबू सरबत प्यावे. द्राक्ष, कलिंगड, डाळिंब यांसारखी फळे खाऊ शकतो.

इ. सुती अंतर्वस्त्र, तसेच सैलसर कपडे घालावेत.

ई. शीतपेये, कॉफी यांसारखे पदार्थ टाळावेत. मसालेदार, खारट आणि आंबट पदार्थ, दही, मासे टाळावेत.

उ. २५० मिलीलिटर पाण्यामध्ये २० मिलीलिटर लिंबाचा रस आणि दीड ग्रॅम खाण्याचा सोडा टाकून मिश्रण तयार करून प्यावे.

४. जंतूसंसर्ग होऊच नये, यासाठी घ्यावयाची काळजी

अ. पाणी पिण्याचे प्रमाण योग्य ठेवणे. लघवी अडवून ठेवू नये.

आ. शौचास जाऊन आल्यानंतर, तसेच शारीरिक संबंधाच्या नंतर विशेषतः स्त्रियांनी योग्य ती स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

इ. स्त्रियांनी मासिक पाळीच्या कालावधीत आणि नंतर शारीरिक स्वच्छतेसाठी कोणत्याही रासायनिक पदार्थांचा उपयोग करू नये. केवळ पाण्याने स्वच्छता करावी.

ई. वारंवार जंतूसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असल्यास अशा व्यक्तींनी पुष्कळ घाम आलेला असल्यास लगेचच घामाचे कपडे पालटावेत.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (२९.४.२०२४)