काश्मीरमध्ये पुन्हा उभे रहाणार मार्तंड सूर्यमंदिर !

काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला. ‘हिंदु धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये’, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक इस्लामी आक्रमकाने आटोकाट प्रयत्न केले; मात्र हिंदु अस्मितेसाठी कटिबद्ध असलेल्या सरकारने मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी आणि मंदिर परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळा उभारण्याचे घोषित केले आहे. ३० एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय आणि रोमन साम्राज्यात सूर्यदेवतेची पूजा, ख्रिस्त्यांनी सूर्यपूजेऐवजी ‘ख्रिसमस’ नावाने साजरा करणे, प्राचीन काळापासून असलेली सूर्यमंदिरे आणि काश्मीरचे महत्त्व, काश्मीर आणि तेथील काही नावांचा इतिहास अन् सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने उभारलेले मार्तंड सूर्यमंदिर आणि त्याविषयी ब्रिटीश लेखकाने केलेले वर्णन’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/789179.html

मार्तंड सूर्यमंदिर

८. सुफींनी काश्मीरवर आक्रमण करून त्याचे प्राचीन सौंदर्य आणि संस्कृती यांचा सर्वनाश करणे 

१४ व्या शतकात काश्मीरवर तुर्कांची आक्रमणे पुन्हा चालू झाली आणि तेथील शांतता भंग झाली ती कायमचीच. पाकपुरस्कृत आतंकवाद चालू होण्याआधी काश्मीरमध्ये हिंदु-मुसलमान कसे गुण्यागोविंदाने रहात होते ?, याचे नेहमी गोडवे गायले जातात. हा भाईचारा काश्मिरी मुसलमानांवर असलेल्या सुफींच्या प्रभावामुळे होता, असेही सांगितले जाते; पण यात इतके चुकीचे काहीच असू शकत नाही. काश्मीरमध्ये सुफींनी केलेल्या रक्तपातामुळेच तेथून हिंदूंनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले अन् काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले. काश्मीरला सुफींची पहिली ओळख झाली ती मीर सय्यद अली हमदानी याची. हा सूफी इराणहून त्याच्या ७०० अनुयायांसह काश्मीरला आला, तेव्हा तो स्वतःला ‘सूफी संत’ म्हणवून घेत असला, तरी त्या मुखवट्याआडचा त्याचा चेहरा अत्यंत धर्मांध होता. त्याच्या प्रभावामुळे काश्मीरमध्ये कट्टरपंथी धोरणे राबवली जाऊ लागली. संगीत, नृत्य, कला यांसारख्या सांस्कृतिक गोष्टींवर बंदी आली. तरीही हिंदु धर्माचे काश्मीरमधून संपूर्ण उच्चाटन न झाल्यामुळे चिडून तो काश्मीर सोडून निघून गेला. इसवी सन १३८४ मध्ये हमदानीच्या मृत्यूनंतर त्याच्यापेक्षाही धर्मवेडा असलेला त्याचा मुलगा महंमद हमदानी त्याच्या ३०० अनुयायांसह वर्ष १३८३ मध्ये काश्मीरला आला. त्याचे आगमन हा काश्मीरच्या भविष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्या वेळी काश्मीरमध्ये कुतुब-दिनचा मुलगा सिकंदर राज्य करत होता. सिकंदर, त्याचा पंतप्रधान सैफुद्दीन आणि हमदानी यांनी काश्मीरमध्ये अत्याचारांचे थैमान घालायला प्रारंभ केला. हिंदूंवर ‘जिझिया कर’लावला गेला आणि त्यानंतर त्यांना तीनच पर्याय देण्यात आले, ‘काश्मीर सोडून जा, मुसलमान धर्म स्वीकारा वा मृत्यूला सामोरे जा.’

श्री. अभिजीत जोग

दुर्दैवी योगायोग असा की, स्वतंत्र भारतात वर्ष १९९० मध्ये काश्मिरी पंडितांना हेच ३ पर्याय देण्यात आले होते. धातूंच्या मूर्ती वितळवून त्यांची नाणी पाडण्यात आली, दगडाच्या मूर्ती फोडून त्यांचे तुकडे मशिदींच्या पायर्‍यांमध्ये वापरण्यात आले. हिंदु धर्मग्रंथ दाल लेकमध्ये फेकून देण्यात आले. सगळी ग्रंथालये जाळून टाकण्यात आली. काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश करण्यात आला. हिंदु धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये, हे हमदानी पिता-पुत्रांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. सिकंदरने केलेल्या मूर्तीच्या या विध्वंसामुळे त्याला ‘सिकंदर बुतशिकन’ (मूर्तींचा संहारक) या नावाने ओळखले जाऊ लागले. या सिकंदरनेच ललितादित्याने बांधलेले मार्तंड सूर्यमंदिरही उद्ध्वस्त केले. याचा विध्वंस करायला सिकंदरला एक वर्ष लागले. शेवटी संपूर्ण मंदिरात लाकडे भरून ते पेटवून देण्यात आले. तरीही ते पूर्णपणे भुईसपाट झाले नाही. आजही या मंदिराचे भग्नावशेष त्याची भव्यता आणि सौंदर्य यांची ग्वाही देतात. काश्मीरचे प्राचीन सौंदर्य आणि संस्कृती यांचा सर्वनाश सुफींनीच केला आहे.

९. मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी म्हणजे भारताच्या आत्मसन्मानाला उजाळा देणारा निर्णय !

अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी की, मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, तसेच या परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकावणेही अशक्य होते, तिथेच आज मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहात आहे. धर्मांध आक्रमकांनी केलेल्या अत्याचारांच्या खुणा जपून ठेवायच्या आणि ललितादित्यासारख्या भारतमातेच्या पराक्रमी पुत्रांची स्मृती मात्र पुसून टाकायची, या दळभद्री धोरणाचा त्याग करून भारताच्या आत्मसन्मानाला उजाळा देणारा निर्णय घेतल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद द्यायला हवेत !

(समाप्त)

– श्री. अभिजीत जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डाव्यांची वाळवी’ या पुस्तकाचे लेखक, पुणे. (१९.४.२०२४)

(साभार : साप्ताहिक ‘विवेक, मराठी’ आणि श्री. अभिजीत जोग यांचे फेसबुक)