विधानसभा निवडणूक झाली, तरी सत्तास्थापन कधी होणार ? आणि कोण मुख्यमंत्री होणार ?, हा पेच बरेच दिवस टिकून आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसमवेतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संसार मांडला होता. त्यानंतर पुढे शिवसेनेच्याच ४० आमदारांनी भाजपसह सत्ता स्थापन केली, तेव्हा झालेला गदारोळ सर्वांनीच पाहिला होता. पुन्हा तसे काही घडू नये, या पार्श्वभूमीवर यंदाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांकडून नुकतेच प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. त्यात लिहिण्यात आले होते, ‘पक्षप्रमुख घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल.’ वेळ आली की, ‘ताकही फुंकून प्यावे’, असे म्हणतात, त्याप्रमाणे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या आमदारांकडून असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे ‘कानाला खडा’, या म्हणीप्रमाणेच प्रत्येक जण शपथविधी होईपर्यंतचे दिवस काढत आहे. ‘आमदारांनी फुटून अन्य पक्षांसह जाऊ नये’, या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घ्यायलाच हवी आणि तशी ती घेतलीही जात आहे; पण येथे प्रश्न पडतो की, जेव्हा उमेदवार पक्षबदलू भूमिका घेतात, इकडून तिकडे उड्या घेतात आणि जनतेचा विश्वासघात करतात, तेव्हा मग जनतेने काय करायचे ? हातावर हात ठेवून शांतपणे त्याकडे बघत बसायचे का ? असे होत राहिले, तर पुढील निवडणुकीत ‘जनतेनेही उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे का ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात येईल.
‘निवडणूक लढतांना जी युती-आघाडी आहे, तिच्यासोबतच जाऊ’, ‘ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो आहे, त्याच्यासोबतच राहू, अन्य पक्षात जाणार नाही’, अशा स्वरूपाची प्रतिज्ञा जनतेनेही मग उमेदवारांकडून करून घ्यावी का ? उमेदवारांकडून घेतली जाणारी पक्षबदलू भूमिका जनतेचा विश्वासघात करणारी ठरते. याविषयी उमेदवारांकडून कधीच विचार होतांना दिसत नाही किंवा त्याविषयी त्यांना कसले देणे-घेणे नाही. प्रत्येकाला केवळ सत्ता संपादन करायची असते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारराजासमोर हात पसरणारा उमेदवार पुढे तो सर्व सोयीस्करपणे विसरतो. जनतेला याची सवय झाली आहे.
या वेळीही झालेल्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निकालातून दिसून आले. त्यातही भाजप अन्य कोणत्याही पक्षाचे साहाय्य घेऊन सत्ता स्थापन करू शकतो, इतक्या पुष्कळ जागा त्याला मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी उमेदवारांचा घोडेबाजार झाल्याचे यंदा दिसून आले नाही. जर तसे झाले असते, तर मतदारांवरही प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ आली असती आणि त्यांनी तसे पाऊल जरी उचलले, तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही. याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार करायला हवा.
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.