पाकिस्‍तानच्‍या कर्माचे फळ !

इम्रान खान आणि शाहबाज शरीफ
डॉ. तुषार रायसिंग

‘आतापर्यंत पाकिस्‍तान सैन्‍य, राजकीय पक्ष आणि जिहादी संघटना या ३ शक्‍तीकेंद्रांकडून चालत होता, ज्‍या मुख्‍यतः भारताच्‍या विरोधात निर्माण झाल्‍या होत्‍या. भारतविरोधी संघर्ष हा आतापर्यंत पाकिस्‍तानच्‍या राजकारणाचा मुख्‍य केंद्रबिंदू होता. तो कायम ठेवून पाकिस्‍तान सरकारने वेळ काढला; पण आता परिस्‍थिती फारच गुंतागुंतीची झाली आहे. पाकिस्‍तानी सैन्‍य दोन गटांत विभागले गेले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खानचे शाहबाज शरीफ यांच्‍या विरोधातील राजकारण रस्‍त्‍यावर आले आहे. जिहादी गटही दोन भागांत विभागले आहेत. लष्‍कर-ए-तोयबा, हिजबुल्ला, जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटना पाकिस्‍तानच्‍या आदेशानुसार चालतात; पण तेहरिक-ए-तालिबान, बलुच लिबरेशन आर्मी या जिहादी संघटना पाकिस्‍तानच्‍या सुरक्षिततेसाठी सर्वांत मोठ्या समस्‍या बनून समोर आल्‍या आहेत.

राजकारणाच्‍या बुद्धीबळात पाकिस्‍तान त्‍याच्‍या चुकीच्‍या धोरणांमुळे अडचणीत आला आहे. पाकिस्‍तानी सैन्‍याला थेट आव्‍हान देणारे इम्रान खान हे पहिले राजकारणी आहेत. पाकचे जुने मित्र आता साहाय्‍य टाळू लागले आहेत. पेट्रोलियम अर्थव्‍यवस्‍था आता चिंतेचा विषय बनली आहे. जग विद्युत् तंत्रज्ञानावर पुढे जात आहे. भारतासमवेत शर्यत करण्‍याच्‍या भानगडीत पाकिस्‍तानने भू-राजकारणाला भू-अर्थशास्‍त्रात रूपांतरित करण्‍याचा पर्याय गमावला आहे. पाकिस्‍तानला स्‍वतःची प्रतिमा सुधारण्‍याची एक आशा होती. क्रिकेटची आंतरराष्‍ट्रीय ‘चॅम्‍पियन ट्रॉफी २०२५’ स्‍पर्धा नुकतीच होणार आहे, त्‍याचा यजमान पाकिस्‍तान होता. बिघडलेल्‍या अंतर्गत परिस्‍थितीचा या स्‍पर्धेवरही परिणाम झाला आहे. आता आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मंडळ ही स्‍पर्धा ‘हायब्रिड मॉडेल’कडे वळवणार आहे. भारत क्रिकेटमधील सर्व साखळी सामने संयुक्‍त अरब अमिरातमध्‍ये (‘युनायटेट स्‍टेटस ऑफ अमिरात’मध्‍ये) खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा हा मोठा विजय आहे.

थोडक्‍यात सांगायचे, तर पाकिस्‍तान त्‍याच्‍या इतिहासात केलेल्‍या चुकीच्‍या कर्मांचे फळ भोगत आहे.

– डॉ. तुषार रायसिंग, संरक्षण आणि सामरिकशास्‍त्र विभाग, उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगाव.