काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया पडली, तेव्हापासून काश्मीरचे प्राचीन ज्ञान आणि संस्कृती यांचा विनाश झाला. ‘हिंदु धर्माचा काश्मीरमध्ये लवलेशही राहू नये’, हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येक इस्लामी आक्रमकाने आटोकाट प्रयत्न केले; मात्र हिंदु अस्मितेसाठी कटिबद्ध असलेल्या सरकारने मार्तंड सूर्यमंदिराची पुनर्उभारणी आणि मंदिर परिसरात सम्राट ललितादित्याचा भव्य पुतळा उभारण्याचे घोषित केले आहे. ज्या काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकावणेही अशक्य होते, तिथेच आज मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहाते आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत किती विलक्षण पालट घडला आहे ? याचेच हे द्योतक आहे.
१. भारतीय आणि रोमन साम्राज्यात सूर्यदेवतेची पूजा
आपण भारतीय सूर्यपूजक आहोत. वैदिक देवतांमध्ये अग्नि, इंद्र, वरुण यांच्या बरोबरीने सूर्यालाही मानाचे स्थान आहे. गायत्री मंत्राचा जप करत हिंदू सहस्रो वर्षांपासून सूर्याची उपासना करत आहेत. इ.स.पूर्व २००० ते १५०० या कालावधीत मिटानी या लढवय्या जमातीने भारतातून उत्तर इराककडे स्थलांतर करून तेथे स्वतःचे राज्य स्थापन केले. तेथील हिटाईट साम्राज्याशी त्यांनी एक करार केला. ‘हा करार आम्ही इंद्र, वरुण आणि मित्र (सूर्य) या देवतांच्या साक्षीने करत आहोत’, असा त्या करारात उल्लेख आहे. मिटानी सूर्यपूजक होते. त्यांनी ही परंपरा मध्यपूर्वेत सगळीकडे रुजवली. त्यांच्याकडून रोमन साम्राज्यानेही ‘सोलर गॉड मिथ्रास (मित्र)’ याच्या रूपात ती आपलीशी केली. रोमन साम्राज्यात सगळीकडे सूर्यपूजा प्रचलित होती आणि ख्रिस्ती धर्माला प्रारंभीला या परंपरेशी स्पर्धा करावी लागली. रोमन साम्राज्यात सॅटर्नालिया हा सण १७ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत साजरा केला जात असे. २५ डिसेंबरचा दिवस ‘सोल इन्व्हेक्टस’ किंवा ‘अनकॉन्कर्ड सन’चा दिवस म्हणून साजरा केला जात असे.
२. ख्रिस्त्यांनी सूर्यपूजेऐवजी ‘ख्रिसमस’ नावाने साजरा करणे
अनेक विद्वानांचे असे म्हणणे आहे की, रोमन साम्राज्याने सम्राट कॉन्स्टंटाईनच्या राजवटीत ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिस्त्यांनी हा सोहळा आपलासा करून तो ‘सूर्यपूजे’ऐवजी ‘येशूचा जन्मदिन’ म्हणून ‘ख्रिसमस’ या नावाने साजरा करायला प्रारंभ केला; कारण येशूचा खरा जन्मदिन कुणालाच ठाऊक नव्हता. पेगन धर्माचा हा सण नव्या नावाने का होईना, हा साजरा करणे सगळ्यांना पटले नाही; म्हणूनच ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आजही ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तात्पर्य काय, तर आपल्या सूर्यदेवतेचा सण आज संपूर्ण जग साजरा करते.
३. प्राचीन काळापासून असलेली सूर्यमंदिरे आणि काश्मीरचे महत्त्व
आदि शंकराचार्यांच्या पंचायतनातही शिव, विष्णु, देवी आणि गणपति यांच्या बरोबरीने सूर्यदेवतेला स्थान देण्यात आले आहे. अशा या सूर्यदेवतेची काही भव्य आणि अप्रतिम मंदिरे आपल्या पूर्वजांनी उभी केली. यातील सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे सिंध प्रांतातील मुलतान (मूलस्थान) येथील सूर्यमंदिर की, जे श्रीकृष्णाचा पुत्र सांबा याने बांधले, असे मानले जाते. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्यमंदिराची उभारणी केली चालुक्य राजा भीम (पहिला) याने वर्ष १०२६-२७ मध्ये ! तसेच पूर्णगंगा राजवंशातील पराक्रमी राजा नरसिंगदेव याने तेराव्या शतकात ओडिशातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराची उभारणी केली.
याच परंपरेतील एक भव्य सूर्यमंदिर, म्हणजे काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील मार्तंड सूर्यमंदिर. प्राचीन काळापासून काश्मीर हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. ‘काश्मीर हा हिंदु धर्माचा सर्वार्थाने मुकुटमणी होता’, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आयरिश इतिहासकार जॉर्ज अब्राहम ग्रिअर्सन लिहितात, ‘२ सहस्र वर्षांपासून अधिक काळ काश्मीर हे संस्कृतच्या अध्ययनाचे केंद्र राहिले आहे. या छोट्याशा खोर्यात इतिहास, काव्य, रोमांचक कथा, तत्त्वज्ञान यांसारख्या विविध विषयांतील अजरामर साहित्य निर्माण झाले आहे. शतकानुशतकांपासून सर्वश्रेष्ठ संस्कृत विद्वानांचे वास्तव्य काश्मीरमध्ये राहिले आहे. भारतातील एक महान धर्म असलेल्या शैव धर्माच्या प्रभावी गुरुजनांनी झेलमच्या किनार्यावर आपली शिकवण दिली आहे.’
४. काश्मीर आणि तेथील काही नावांचा इतिहास
संस्कृतच्या काही सर्वश्रेष्ठ पंडित आणि कवी यांचा जन्म काश्मीर खोर्यात झाला आहे. संस्कृतमधील जगप्रसिद्ध कथा वाङ्मय असलेल्या पंचतंत्राची निर्मितीही काश्मीरमध्येच झाली आहे. नीलमत पुराणात सांगितलेल्या कथेनुसार काश्मीरचे खोरे हे एक मोठे सरोवर होते. जलोद्भव या राक्षसाने या सरोवराचा ताबा घेऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायला प्रारंभ केल्यामुळे ऋषि कश्यप यांनी श्रीविष्णूची आराधना केली. श्रीविष्णूने वराहाचे रूप घेऊन एका पर्वतावर आपल्या सुळ्यांनी प्रहार करून पाण्याला वाट करून दिली. ते पाणी वितस्ता (झेलम) नदीच्या रूपाने वाहू लागले आणि काश्मीर खोरे मुक्त झाले. जिथे वराहरूपी श्रीविष्णूने सुळ्यांचा प्रहार केला ती जागा वराहमूल (बारामुल्ला) या नावाने ओळखली जाऊ लागली. यानंतर काश्मीर खोर्यात वस्ती करणार्या लोकांना काश्मीरलगत असलेल्या पूर्व अफगाणिस्तान, लडाख या भागांतील विषाणिन (पिशाच्च) वंशाच्या लोकांनी त्रास द्यायला प्रारंभ केला. पार्वतीच्या विनंतीवरून ऋषि कश्यप आणि त्यांचा पुत्र नील नाग यांनी पिशाच्चांचा बंदोबस्त केला आणि या भागात ते वास्तव्य करू लागले. त्यावरूनच ‘पांजाल’ पर्वतराजीच्या प्रदेशाला ‘कश्यप मेरू (काश्मीर)’ असे नाव पडले.
५. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश
काश्मीरमध्ये ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती आणि काव्य यांची अत्यंत समृद्ध परंपरा निर्माण झाली. इसवी सनपूर्व तिसर्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाला. कुशाण सम्राट कनिष्क याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात बौद्ध धर्माच्या चौथ्या महासभेचे आयोजन काश्मीरमधील कुंडलवन येथे केले. बौद्ध धर्मातील ग्रंथांचे जतन त्यांच्या मूळ, शुद्ध स्वरूपात व्हावे; म्हणून त्यांचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय याच सभेत घेण्यात आला. बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा प्रारंभही काश्मीरमध्ये झाला. नंतर वसुमित्र आणि नागार्जुन या दोन विद्वानांनी महायान पंथाची वैचारिक जडणघडण केली. काश्मीरमधील बौद्ध विद्वानांनी चीन आणि तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. इस्लामी आक्रमणाआधी काश्मीर हा एक खुला आणि उदारमतवादी समाज होता, जिथे हिंदु आणि बौद्ध दोन्ही धर्म सुखेनैव नांदत होते, तसेच स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य अन् बरोबरीचे स्थान होते. कार्कोट, उत्पल, लोहार यांसारख्या राजवंशांनी काश्मीरवर राज्य केले आणि काश्मीरच्या वैभव अन् सांस्कृतिक वारशात भर घातली. यापैकी उत्पल राजवंशाचे राजे हे चर्मकार जातीचे होते. भारतातील जातीव्यवस्थेचे विकृत चित्रण नंतर ब्रिटीश आणि विशेषतः मिशनरी यांनी केले.
६. सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने उभारलेले मार्तंड सूर्यमंदिर आणि त्याविषयी ब्रिटीश लेखकाने केलेले वर्णन
इ.स. ७११ मध्ये महंमद बिन कासिम याने सिंधवर आक्रमण केले, तेव्हा काश्मीरमध्ये कार्कोट राजवंशाचे राज्य होते. सिंध प्रांत जिंकून घेतल्यानंतर अरब सैन्याने उत्तर भारताकडे मोहरा वळवला. पंजाबमधील कांग्रा येथे त्यांची गाठ कार्कोट वंशाचा पराक्रमी सम्राट ललितादित्य मुक्तपीड याच्याशी पडली. ललितादित्याने अरबांच्या सैन्याला धूळ चारली आणि उत्तर भारताला इस्लामी आक्रमणापासून सुरक्षित ठेवले. त्यानंतर त्याने सिंधू नदीपलीकडे भरारी घेऊन दर्दीस्तान, बुखारा, बाल्ख यांसारखे मध्य आशियातील प्रदेश पादाक्रांत केले.
सम्राट ललितादित्याने काश्मीरमध्ये अनेक शहरे वसवली आणि अप्रतिम स्थापत्य असलेल्या सुंदर इमारतींचे बांधकामही त्याच्या काळात झाले. यात प्रामुख्याने समावेश होता मार्तंड सूर्यमंदिर या भव्य, वैभवशाली आणि अप्रतिम सुंदर अशा इमारतीचा ! असे म्हणतात की, हे मंदिर सर्वप्रथम पांडवांच्या वंशातील राजा रामदेव याने इ.स.पूर्व ३००७ मध्ये बांधले. त्यानंतर अनेक राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण केले; पण त्याचे जगाला ज्ञात असलेले भव्य अन् सुंदर स्वरूप त्याला ललितादित्याच्या कारकीर्दीतच, म्हणजे ८ व्या शतकात मिळाले. या मंदिरात अप्रतिम कोरीव काम केलेले एकूण ८४ खांब होते. आठवड्याचे दिवस (७) आणि एकूण राशींची संख्या (१२) यांच्या गुणाकारातून येणारी ८४ ही संख्या हिंदु धर्मात महत्त्वाची मानली जाते. ८४ लाख योनींमध्ये जिवाला जन्म घ्यावा लागतो, हे आपण ऐकलेले असते. ‘हिंदु आगमशास्त्रा’प्रमाणे बांधलेल्या या मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि मंडप यांचा समावेश होता. मंदिराचा एकूण परिसर २३० फूट लांब आणि १८० फूट रुंद होता अन् त्याला
३ प्रवेशद्वारे होती. त्याच्या मध्यभागी ६३ फूट लांब आणि ३६ फूट रुंद अशी मुख्य मंदिराची इमारत होती. त्याच्याभोवती ३६० छोटी मंदिरे होती. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले होते, ते स्थानही निसर्गसौंदर्याने नटलेले होते, ज्याच्या सौंदर्याची बरोबरी मंदिराच्या अप्रतिम स्थापत्याने आणि कारागिरीने केली होती, असे त्याचे वर्णन केले जाते.
ब्रिटीश लेखक फ्रान्सिस यंगहजबंड यांनी त्यांच्या ‘काश्मीर’ या ग्रंथात मार्तंड सूर्यमंदिराविषयी भरभरून लिहिले आहे. ते म्हणतात, ‘पार्थेनन असो वा ताजमहाल वा सेंट एस्क्युरिअल, जगातील कुठल्याही इमारतीपेक्षा अत्युत्कृष्ट जागी बांधलेल्या या इमारतीवरून काश्मिरी लोकांमधील सर्वोत्कृष्टतेचे दर्शन घडते. खुल्या आणि समतल पठारावर, बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर, हसर्या काश्मीर खोर्याकडे दृष्टी टाकणार्या या जागी उभे आहेत एका मंदिराचे भग्नावशेष. एक असे मंदिर, ज्यात होती इजिप्तची भव्यता आणि ग्रीकांची अभिजातता. निसर्गसौंदर्याची पारख नसलेल्या कुणी मंदिरासाठी ही जागा निवडलीच नसती, तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव असलेल्या कुणी हे मंदिर इतक्या भव्य आणि चिरंतन पद्धतीने बांधलेच नसते.’
७. काश्मीरमध्ये इस्लामी आक्रमकांनी हिंदु धर्म संपवण्याचा केलेला प्रयत्न
या पवित्र, भव्य आणि सुंदर मंदिराचा विध्वंस कधी अन् का झाला ? हे समजून घेण्याआधी काश्मीरसारख्या समृद्ध, शांत आणि आनंदी प्रदेशावर इस्लामची काळी छाया कधी आणि कशी पडली ? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. काश्मिरी ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी एम्.के. काव आपल्या ‘काश्मीर अँड इट्स पीपल’ या पुस्तकात म्हणतात, ‘आपली विचारधारा आणि विश्वास, धर्मशास्त्र, कट्टर कायदे आणि आचारसंहिता, आठवणी अन् आख्यायिका यांच्यासह जेव्हा १४ व्या शतकात इस्लामचे काश्मीरमध्ये आगमन झाले, त्या वेळी काश्मिरी समाजाच्या सगळ्या धारणा उलट्यासुलट्या झाल्या. त्यानंतर झालेल्या प्रलयकारी घटनांमुळे काश्मीरचा संपूर्ण सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पोत विस्कळीत झाला.’
इ.स. १००० नंतर लगेचच महंमद गझनीने काश्मीरवर आक्रमण केले. त्याच्याशी कडवा संघर्ष करणार्या हिंदुशाही राज्याच्या जयपालचा नातू त्रिलोचनपाल याला काश्मीरच्या लोहार राजवटीचा संग्रामराजा याने आश्रय दिल्याचा प्रतिशोध म्हणून महंमद गझनीने त्याचे सैन्य काश्मीरचा घास घेण्यासाठी पाठवले. त्याचा मोठा पराभव झाल्यानंतर स्वतः गझनी सैन्य घेऊन काश्मीरवर चालून आला आणि त्याने वर्ष १०१५-१६ मध्ये लोहारकोट गडाला एक महिन्यासाठी वेढा घातला; पण तोपर्यंत हिवाळा आणि बर्फवृष्टी चालू झाली अन् गझनीच्या सैन्याची दाणादाण उडाली. अधिक जीवित हानी होऊ नये; म्हणून त्याने वेढा उठवून काढता पाय घेतला. त्यानंतर ३०० वर्षे काश्मीरकडे इस्लामी पावले वळली नाहीत.
– श्री. अभिजीत जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘डाव्यांची वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (१९.४.२०२४)
(क्रमश:)
(साभार : साप्ताहिक ‘विवेक, मराठी’ आणि श्री. अभिजीत जोग यांचे फेसबुक)
संपादकीय भूमिकाइस्लामी आक्रमकांनी हिंदूंची बळकावलेली मंदिरे हिंदूंना परत मिळवून देण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक ! |