चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून श्रीलंकेत बांधलेल्या विमानतळाचे दायित्व भारतीय आणि रशिया यांच्या आस्थापनांकडे !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून बांधलेल्या विमानतळाच्या व्यवस्थापनाचे दायित्व पुढील ३० वर्षांसाठी भारत आणि रशिया या देशांतील आस्थापनांकडे सोपवण्यात आली आहे.

सौजन्य  StudyIQ IAS

१. श्रीलंकेच्या मंत्रीमंडळाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनने बांधलेल्या ‘मत्तला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे (‘एम्.आर्.आय.ए.’चे) व्यवस्थापन भारताला देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. पुढील ३० वर्षांसाठी या विमानतळाच्या व्यवस्थापनाचे दायित्व भारतातील ‘शौर्य एरोनॉटिक्स (प्रा.) लिमिटेड’ आणि रशियातील  ‘एअरपोर्टस ऑफ रीजन्स मॅनेजमेंट’ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी उपक्रमांकडून होणारा तोटा न्यून करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

२. चीनच्या एक्झिम बँकेने ‘मत्तला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या बांधकामासाठी कर्ज दिले होते. या विमानतळाचे उद्घाटन वर्ष २०१३ मध्ये झाले होते; परंतु या विमानतळावर फारच अल्प व्यवसाय होत असल्याने या विमानतळाचे बांधकाम वादात सापडले आहे. येथे प्रवासी अल्प असल्याने विमानांची संख्या सातत्याने न्यून होऊ लागली आहे. हे विमानतळ पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत संवेदनशील असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘राष्ट्रपती राजपक्षे यांच्या कुटुंबियांनी विनाकारण विमानतळ बांधले’, असे म्हटले जात आहे. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की, हे विमानतळ बांधून चीनने श्रीलंकेला आणखी एका कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. विशेष म्हणजे राजपक्षे कुटुंबियांनी हे विमानतळ त्यांच्या गावी बांधले आहे, जिथे त्याची आवश्यकताच नव्हती.