दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…

भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !

भावना गवळी

यवतमाळ – शिवसेनेच्या खासदार भावना गवळी नेहमी अतिशय उत्साहात मतदान करतात; परंतु यंदा तिकीट न मिळाल्याने त्यांनी मतदान केले नाही, अशी चर्चा आहे. त्या सकाळी मतदान करण्यासाठी बाहेर पडल्या; परंतु त्या मतदान केंद्राकडे गेल्या नाहीत, असे सांगण्यात आले. दुपारपर्यंत त्या मतदान केंद्रावर पोचल्या नव्हत्या. आतापर्यंत ५ वेळा त्या खासदार म्हणून यवतमाळ, वाशीम येथून निवडून आल्या आहेत. आता शिवसेनेकडून राजश्री पाटील, तर ठाकरेसेनेकडून संजय देशमुख येथे उभे आहेत.


दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान ! 

अमरावती – रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बेवारस, दिव्यांग मुलांना पितृछत्र देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्यभर धडपड करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी त्यांच्या बालगृहातील ६० मुलांसह मतदान केले. अचलपूर तालुक्यात वझ्झर येथे ‘स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृह’ आहे.


 पनवेल येथील ‘शोरूम’मध्ये चोरी

पनवेल – शहरातील शीव-पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ-ऑप. इस्टेटमधील ‘हॉलमार्क मोटार कंपनी’च्या शोरूममध्ये २४ एप्रिलला पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली आहे. चोराने लॅपटॉप, भ्रमणभाष आणि रोख रक्कम पळवली. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.


कळवा पोलीस ठाण्याचे २ लाचखोर पोलीस कह्यात

ठाणे, २६ एप्रिल (वार्ता.) – नाशिक येथून मुंबई येथे अल्युमिनियमच्या पट्ट्या वाहून नेणारा टेंपो जप्त करण्यात आला होता. तो सोडवण्यासाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या कळवा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (वय ४० वर्षे) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (वय ४९ वर्षे) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

संपादकीय भूमिका 

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !


अमली पदार्थसाठा प्रकरणात पोलिसांची चौकशी होणार !

विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील कुपवाड आणि इरळी (तालुका कवठेमहांकाळ) येथे मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून ५४५ कोटी रुपयांचा २६२ किलो ‘एम्.डी.’ या अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला. या प्रकरणी स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेची गृहमंत्रालयाने विशेष नोंद घेतली. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यंत्रणांच्या सखोल चौकशीचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.