पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत आसिफ दुर्रानी यांचे विधान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमावाद वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये चालू असलेल्या सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील विशेष राजदूत आसिफ दुर्रानी यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, अफगाणिस्तानसमवेतच्या संघर्षामुळे पाकिस्तानला भारतासमवेत झालेल्या ३ युद्धांपेक्षा अधिक पैसा खर्च झाला आहे. या संघर्षामुळे झालेली हानी जीवित असो किंवा मालमत्तेची असो किंवा आर्थिक हानी असो, त्याचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे.
दुर्रानी पुढे म्हणाले की,
१. गेल्या २ दशकांत आतंकवादामुळे ८० सहस्रांंहून अधिक पाकिस्तानी मारले गेले आहेत आणि हे प्रमाण वाढू शकते. अफगाणिस्तानातून ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सैन्याने माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य निर्माण होऊन संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा होती; पण हे काही दिवसांसाठीच शक्य झाले.
२. पाकिस्तानच्या सीमेवरील भागांत प्रतिबंधित ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आक्रमणांमध्ये ६५ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी आत्मघाती आक्रमणे ५ पटींनी वाढली आहेत.
३. टीटीपी आतंकवादी संघटना पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी अफगाणी भूमीचा वापर करते, ही पाकिस्तानसाठी गंभीर चिंतेची गोष्ट आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे या आक्रमणांमध्ये अफगाण नागरिकही सहभागी होतात.
४. वर्ष १९७९ मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात त्याचे सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भूराजकीयदृष्ट्या पाकिस्तानची हानी झाली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील आक्रमणानंतरच्या जागतिक व्यवस्थेचाही पाकिस्तानवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
५. या घडामोडींमुळे पाकिस्तानला गैर-नाटो सहयोगी देश म्हणून नियुक्त करण्यात आले. पाकिस्तानशी व्यापार करणे महाग झाले. याखेरीज पाकिस्तानची निर्यात ठप्प झाली.