रामराज्याचे ध्येय साकार करण्यासाठी हिंदूंनी साधना करावी ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रे’चे आयोजन

शोभायात्रेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ आणि महिला धर्मप्रेमी

वाराणसी – अनुमाने ५०० वर्षांपासून साधूसंत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू यांनी केलेल्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीराममंदिरामध्ये रामलल्ला (श्रीरामाचे बालकरूप) विराजमान झाले आहे. त्यामुळे आता जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी आणि श्रीरामभक्त सहभागी झाले होते. धर्मध्वजपूजन करून शंखनाद करण्यात आला. त्यानंतर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या जयघोषात मदागीन चौकातून शोभायात्रेचा प्रारंभ झाला आणि चित्तरंजन पार्कमध्ये समारोप झाला. शहरातील विविध भागात शोभायात्रेतील श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन समाजातील विविध हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आले. त्यामुळे शोभायात्रेत सहभागी झालेल्यांची भावजागृती होत होती.

समारोपीय भाषण करतांना समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘अयोध्येत रामलल्लाची स्थापना ही देशात रामराज्य साकार होण्याचे संकेत आहेत. रामनवमीच्या शुभप्रसंगी सर्व हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याचे लक्ष्य साकार करण्याचा संकल्प करावा, तसेच आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी साधना करावी.’’

क्षणचित्रे

१. फ्रान्स येथून आलेले एक दांपत्य शोभायात्रा पाहून भारावून गेले. त्यांनी यात्रेचे ध्वनीचित्रमुद्रण केले.

२. शोभायात्रेच्या शेवटी एका पोलीस कर्मचार्‍याने सांगितले की, ही यात्रा अतिशय शांततापूर्ण निघाली आणि मला अतिशय आनंद झाला. त्यांनी साधना करण्याची इच्छा व्यक्त केली.

३. यात्रेतील हिंदुत्वनिष्ठ एकमेकांना नामजप करण्यासाठी प्रेरणा देत होते.