प्रभु श्रीराम आणि भक्तशिरोमणी हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे दर्शन घडवणारी भावकविता !

‘वर्ष २०१३ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे सूक्ष्मातून दर्शन झाले. तेव्हा देवाच्या कृपेने त्यांच्या भावभेटीवर मला पुढील कविता स्फुरली. त्याचे टंकलेखन मी आता केले. प्रभु श्रीराम आणि भक्तशिरोमणी हनुमान यांच्या पावन चरणी त्यांची ही भावकविता सुगंधी पुष्पांच्या रूपात अर्पण करत आहे. ‘प्रभु श्रीरामाने आम्हा सर्व साधकांवर कृपा करून आमच्या अंतरंगातही हनुमानाप्रमाणे दास्यभक्ती निर्माण करून आमच्याकडून गुरुसेवा करवून घ्यावी’, हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.

ऋष्यमुख गिरीजवळील रम्य वन ।
रामचंद्रांचे होता दिव्य आगमन ।।
चरण स्पर्शाने झाले पावन ।
हर्षित झाले धरणी अन् गगन ।। १ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

सुग्रीवाचे ऐकून वचन ।
हनुमंताने त्यजले ध्यान ।।
राजाज्ञेचे करण्या पालन ।
त्याने केले श्रीरामाकडे प्रयाण ।। २ ।।

अकस्मात् झाले प्रभु रामांचे दर्शन ।
भारावून गेले केसरीनंदन (टीप १)।।
पाहूनी ते दिव्यरूप सुदर्शन ।
भाववश झाले अंजनीनंदन (टीप १)।। ३ ।।

भेद जाणायचे मनी प्रयोजन ।
हनुमानाने केले ब्राह्मणरूप धारण ।।
देवभाषेत गुंफूनी शब्दसुमन ।
आरंभिले मधुर संभाषण ।। ४ ।।

रघुरायांचे प्रसन्न वदन ।
हनुमान पाही चकित होऊन ।।
श्रीरामाने त्यासी ओळखले मनोमन ।
विस्मित झाले केसरीनंदन ।। ५ ।।

दिव्य मनोहर सुंदर श्रीरघुनंदन (टीप २)।
हनुमान पाही मंत्रमुग्ध होऊन ।।
हनुमानाने छद्मवेश (टीप ३) सोडून ।
प्रभु श्रीरामाला केले वंदन ।। ६ ।।

कपिश्रेष्ठ दोन्ही हात जोडून ।
मूळ रूपात प्रकट होऊन ।।
प्रभु श्रीरामाला गेले शरण ।
घट्ट धरले प्रभूंचे श्रीचरण ।। ७ ।।

प्रभु चरणांसी करण्या वंदन ।
भावाश्रू वाहिले बांध तोडून ।।
श्रीरामाने दिले त्यांसी गाढ आलिंगन ।
हनुमान गेला भारावून ।। ८ ।।

भक्त-भगवंत यांची भेट पाहून ।
भावविभोर झाले सारे तपोवन ।।
हरिहरांचे (टीप ४) पाहून मीलन ।
धन्य झाला सुमित्रानंदन (टीप ५) ।। ९ ।।

राम वदले, मी कपिराज सुग्रीवास भेटून ।
तयासंगे मैत्री करीन ।।
वानरसैन्य ज्याच्या आधीन ।
त्या सुग्रीवासंगे मम भार्या शोधीन ।। १० ।।

प्रभु श्रीरामांचे हे वचन ऐकूनी ।
श्रीराम-लक्ष्मण यांना खांद्यांवर घेऊनी ।।
ऋष्यमुख पर्वताकडे उड्डाण करूनी ।
कपिश्रेष्ठ आला भगवंताला घेऊनी ।। ११ ।।

सन्मुख पहाता कौसल्यानंदन(टीप २) ।
सुग्रीव गेला देहभान हरपून ।।
रामरायांना करूनी वंदन ।
सुग्रीवाने केले संपूर्ण समर्पण ।। १२ ।।

रामभक्तीने दाटले अंतःकरण ।
भक्तीमय झाले वातावरण ।।
श्रीचरणी अर्पिण्या सेवासुमन ।
सुग्रीवाने सीताशोधाचे दिधले वचन ।। १३ ।।

सुग्रीवाने केले कथन ।
प्रभु श्रीरामचंद्र दशरथनंदन (टीप २)।
घेता त्यांचे पुण्यदर्शन ।।
धन्य झाले माझे जीवन ।। १४ ।।

टीप १ – हनुमान

टीप २ – श्रीराम

टीप ३ – वेषांतर

टीप ४ – प्रभु श्रीराम आणि ११ वा रुद्र असलेला हनुमान

टीप ५ – लक्ष्मण

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक