नात्यांमधील बाजारूपणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

एका कुटुंबात एका व्यक्तीचे निधन झाले होते. तिच्या मृत्यूनंतरच्या विधींची सिद्धता करणे चालू होते. ही सर्व सिद्धता धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कशी करता येईल आणि त्या व्यक्तीलाही पुढील गती मिळावी, या दृष्टीनेच सर्व काही पद्धतशीरपणे करण्याचा त्या कुटुंबाचा प्रयत्न होता. यासंदर्भात तेथे उपस्थित असलेला रुग्णवाहिकेचा चालक त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही सर्वजण किती चांगल्या प्रकारे सिद्धता करत आहात ! नाही तर सध्या लोक काहीच करत नाहीत. आम्हालाच भ्रमणभाष करून सांगतात, ‘अमुक ठिकाणी आमच्या अमुक नातेवाइकांचे निधन झाले आहे. तुम्हीच सर्व विधी पूर्ण करा. आम्हाला येणे शक्य नाही. झाले की कळवा. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो’. आता या गोष्टींची आम्हाला सवय झाली आहे. त्यामुळे तुमची शास्त्रशुद्ध सिद्धता पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.’’ हे सर्व ऐकून आपण अवाक् होतो. ‘मृत व्यक्तीला स्मशानात नेणे आणि मृत्यूत्तर विधी परस्पर करायला सांगून त्याचे पैसे पाठवणे,’ असे करायला ती व्यक्ती, म्हणजे काय बाजारू वस्तू आहे का ? मृत व्यक्तीच्या विधींचा बाजार केल्यासारखेच आहे. नातेसंबंधच संपुष्टात येत असल्याने हे उदाहरण म्हणजे समाजाने गाठलेली हीन पातळीच दर्शवते. मृतदेहाला अग्नी कुणीतरी देईल; पण त्या आपल्या माणसाच्या जिवाच्या आत्म्याला समाधान तरी मिळेल का ? निश्चितच नाही ! तो अतृप्तच रहाणार.

जन्माच्या वेळी आनंद असतो; पण मृत्यूच्या वेळी दुःख असते; पण दुःख व्यक्त करण्याइतक्या भावनाही मनुष्याने स्वतःकडे ठेवलेल्या नाहीत ! तंत्रज्ञान, विज्ञान, भ्रमणभाष, पैसा या सर्वांच्या मागे धावून मनुष्याने भावभावना जणू आयुष्यातून पूर्णपणे काढूनच टाकलेल्या आहेत. यामुळेच मृत व्यक्तींच्या संदर्भात असे प्रकार होत आहेत. मृत व्यक्तीची खरेतर अशी अवहेलना करू नये; पण ‘आपण सुटलो’, अशी मानसिकता असणार्‍यांना हे सांगणार कोण ? स्वतः तर पुण्य मिळवायचे नाही आणि नातलगांच्या मृत्त्यूत्तर क्रियाकर्मातून जे काही पुण्य मिळणार असेल, ते मात्र अंत्यविधी करणार्‍याच्या पदरी टाकायचे. हे लाजिरवाणे नव्हे का ? आपण पैसा कुणासाठी कमावतो ? आपल्यासाठी, आपल्याच माणसांसाठी ! मग नात्यांच्या मूल्याची अशी किंमत चुकती करून आपणच माणुसकीला काळीमा फासत आहोत. नात्यांमध्ये प्रेमापोटी होणारी देवाणघेवाण संपत आहे. नात्यातील आपुलकी, जिव्हाळा तर केव्हाच निघून गेला आहे ! एकीकडे तंत्रज्ञानाच्या जोरावर विकास साधायचा; पण नात्यांची नाळ मात्र तोडून टाकायची, ही कसली आली प्रगती ? ही तर अवनती आणि अधोगती आहे ! तंत्रज्ञानाचे युग किंवा पैसा आपल्याला प्रेम, नात्यांमधील गोडवा देऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन नाती जपा अन् नात्यांतील कर्तव्ये पार पाडा !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.