मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !

१० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी धर्मपालनासाठी कटिबद्ध !

डावीकडून श्री गिरिजानंद सरस्वतीजी महाराज, प्रसिद्ध उद्योजक श्री. संतोष बारणे, (सत्कार स्वीकारताना ) श्री. चेतन राजहंस, सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगेश हिंगणे, श्री. नीलेश बोराटे

पुणे, १९ एप्रिल (वार्ता.) – ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’च्या वतीने १८ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात विविध कार्यक्रम, तसेच मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर येथील ‘हरिद्वार आनंद आखाडा’चे महंत श्री गिरिजानंद सरस्वतीजी महाराज, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, श्री कालीचरण महाराज, हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी या उत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपिठावर भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे, आयोजक श्री. नीलेश बोराटे यांसह अन्य मान्यवरही उपस्थित होते. या वेळी १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी पुरुष आणि महिला कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी अनेक लहान मुले-मुली श्रीराम, सीतामाता आणि हनुमान यांची वेशभूषा धारण करून आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवर वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवर वक्त्यांनी भाषणे केली आणि श्री कालीचरण महाराज यांनी ‘शिवतांडवस्तोत्र’ प्रस्तुत केले.

डावीकडून उद्योजक श्री.संजय बोराटे, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, (सत्कार स्वीकारताना ) श्री. सुनील घनवट, श्री कालीचरण महाराज, श्री. रामदास बोराटे, श्री. चेतन राजहंस, सामाजिक कार्यकर्ते श्री. निखिल बोऱ्हाडे

श्री. सुनील घनवट यांनी धर्मपालनासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प सर्वांना सांगितला. या वेळी सर्वांनी आपल्या भ्रमणभाषची विजेरी चालू करून केलेल्या संकल्पांना अनुमोदन दिले. शेवटी श्रीरामाची आरती होऊन कार्यक्रम संपला.

प्रत्येकाच्या हृदयात श्रीराम निर्माण झाल्याची भावना हाच प्रभु श्रीरामचंद्राचा आशीर्वाद ! – महंत श्री गिरिजानंद सरस्वती महाराज

अनेक जण विविध मार्गाने भक्ती करतात. त्या सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न श्री. नीलेश बोराटे यांच्यासारखी मंडळी करत असतात. आज प्रत्येकाच्या हृदयात श्रीराम निर्माण झाल्याची भावना आहे. हाच प्रभु श्रीरामचंद्राचा आशीर्वाद आहे.

प्रभु श्रीरामाच्या अवतरणामुळेच देश भगवामय होत आहे ! – ह.भ.प. संग्रामबापू भंडारे

२२ जानेवारीला अयोध्या येथे झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देश भगवामय झाला आहे, ते प्रभु श्रीरामामुळे ! व्यावहारिक विकास प्रारब्धामुळे होणार आहे म्हणून मंदिरे बांधावी लागतील, धर्म टिकवावा लागेल. मोगलांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुनर्स्थापित करण्यासाठी आपण सत्तेत कुणाला बसवतो ? हे महत्त्वाचे आहे. हिंदू संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे तळातला शेतकरी वर आणायला अजून वेळ लागेल. जो देश आपला धर्म, संस्कृती विसरत नाही, तोच देश या जगात टिकून राहतो.

पुरुषोत्तम श्रीरामाचे आदर्श जीवन आचरणात आणणे म्हणजेच धर्म ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्रेष्ठ पुरुषांचा आदर्श आचरणात आणणे, हा धर्म आहे. श्रीराम हे सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ होते आणि म्हणूनच त्यांना ‘पुरुषोत्तम’ म्हटले जाते. अशा श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श ठेवून आपण सर्वांनी कृती केल्यास ते धर्मपालनच होईल. श्रीराम हे प्रत्यक्ष धर्माचे स्वरूप आहेत. आज लोकशाहीत खुर्चीचा त्याग करणे कठीण आहे; परंतु श्रीरामाने अयोध्येचा, वालीच्या वधानंतर किष्किंधेचा आणि रावणाचा वध केल्यानंतर लंकेचा त्याग करत अन्यांकडे राज्य चालवण्याचे दायित्व दिले. आपला समाज हा योद्धा समाज आहे. ब्रिटिशांनी मात्र आपल्याला कायद्याने शस्त्रहीन केले आणि वर्ष १९२० नंतर आपल्या मनातूनही शस्त्रे काढून घेण्यात आली. आपण शांतीची कबुतरे सोडत राहिलो; पण श्रीरामाने लंकेवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणात शेवटच्या काही कालावधीमध्ये साक्षात् काशीमुक्तेश्वर अवतरले. जेव्हा देवता अवतरित होतात, तेव्हा धर्मराज्य येणार आहे, हे ओळखावे अन् तेच रामराज्य आता येणार आहे.

आता राजसत्ता नको, तर रामसत्ता हवी ! – धनंजय देसाई, संस्थापक अध्यक्ष, हिंदुराष्ट्र सेना

आज लहान मुले सांताक्लॉज न होता श्रीराम, शिवराय, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची वेशभूषा करत आहेत, हीच रामराज्याची नांदी आहे. धर्माचे पालन सोडू नका. आपल्या भारताचे पापस्तान होत आहे. लव आणि कुश यांची नगरी आज लाहोर- कराची झाली आहे. आता राजसत्ता नको, तर रामसत्ता हवी. राजकारण, समाजकारण, शिक्षण, आचरण हे सर्व भारतीयत्वाचे असायला हवे.

आयोजक श्री. नीलेश बोराटे यांचा परिचय

श्री. नीलेश बोराटे मोशी, चिखली परिसरात आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करून राष्ट्र-धर्म संस्कृतीचा विषय समाजापर्यंत पोचवतात. समाजामध्ये चांगले, सुसंस्कृत आणि राष्ट्र-धर्माचे विचार पोचावेत, हा उद्देश ठेवून ते श्रीरामनवमीसारखे मोठे धार्मिक उत्सव आयोजित करत असतात.