Nestle India : विदेशी ‘नेस्ले’ आस्थापनाच्या भारतात विकण्यात येणार्‍या लहान मुलांच्या पदार्थांमध्ये आढळून आली साखर !

  • जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये नसते साखर !

  • साखरेचा वापर मुलांच्या आरोग्यासाठी अहितकारक !

नवी देहली – ‘नेस्ले’ आस्थापनाच्या लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये (बेबी फूडमध्ये) मोठ्या प्रमाणात साखर आढळल्याचा दावा ‘पब्लिक आय’ या संकेतस्थळाने केलेल्या तपासणीतून केला जात आहे. ‘साखरेचा वापर लहान मुलांच्या स्वास्थासाठी हितकारक नाही. अशा प्रकारे केलेल्या साखरेच्या वापराने जुने आजार आणि मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असून मुलांना साखर खाण्याची सवय लागू शकते’, असे या संकेतस्थळाच्या अहवालात म्हटले आहे.

१. ‘नेस्ले’ तिच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या संपूर्ण सामग्रीचा उल्लेख वेष्टनावर करते; मात्र साखरेचा केलेल्या वापराचा उल्लेख यात नसतो. साखरेच्या वापर नेस्ले कडून लपवला जात असल्याचे यात दिसून येते.

२. भारतात विकल्या जाणार्‍या सगळ्या ‘सेरेलॅक’ आणि ‘बेबी प्रॉडक्ट्स’ यांमध्ये ठरवलेल्या प्रमाणानुसार आहारात सरासरी ३ ग्रॅम साखर असते. एका वेळी मुलांना किती प्रमाणात सेरेलॅक द्यावे लागते, हे आस्थापनाकडून सांगण्यात येते.

३. आफ्रिकेतील इथिओपिया आणि आशियातील थायलंड यांसारख्या देशांमध्ये ६ ग्रॅमपर्यंत साखर आढळून आली आहे.

४. विशेष म्हणजे जर्मनी आणि ब्रिटन यांसारख्या विकसित देशांमध्ये जेव्हा ही उत्पादने विकली जातात, तेव्हा त्यात साखर नसते. यावरून ‘भारतियांची फसवणूक होत आहे’, हे लक्षात येते.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने तात्काळ याची नोंद घेऊन नेस्लेच्या या पदार्थांवर भारतात बंदी घालून तिच्या अन्य पदार्थांचीही पडताळणी करणे आवश्यक झाले आहे !