T Raja Singh : भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी काँग्रेस सरकारचा विरोध झुगारून काढली मिरवणूक !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे पोलिसांनी रामनवमीच्या मिरवणुकीला नाकारली होती अनुमती !

भाजप आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना रामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीची अनुमती नाकारण्यात आली होती. तरीही टी. राजा सिंह यांनी सरकारचा विरोध झुगारून अनुमती नसतांनाही मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सहस्रो हिंदूंनी प्रतिवर्षीप्रमाणेच यात सहभाग घेतला.

१. आमदार टी. राजा सिंह यांनी सांगितले की, १६ एप्रिलला रात्री ८.३० वाजता पोलिसांनी एक पत्र पाठवून कळवले की, यावर्षी रामनवमीच्या मिरवणुकीची अनुमती रहित करण्यात आली आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी फारच कमी वेळ उरला होता. अनेक वर्षांपासून काढण्यात येणारी रामनवमीची मिरवणूक, हे भक्तीचे प्रतीक आहे. या मिरवणुकीला देशभरातून लाखो रामभक्त येतात. हिंदूंच्या स्वातंत्र्यावर विनाकारण गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे. या आधी सत्तेत असलेल्या के. चंद्रशेखर राव सरकारच्या पावलावर पाऊल ठेवणार्‍या काँग्रेस सरकारकडून आम्हाला अनुमती नाकारण्याच्याच निर्णयाची अपेक्षा होती.

२. ही मिरवणूक आकाशपुरी हनुमान मंदिरापासून रामकोटी येथील हनुमान व्यायामशाळेपर्यंत काढण्यात आली. त्यासाठी सकाळी १० ते रात्री १० अशी वेळ मागितली होती; मात्र तेलंगाणा पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली होती.

जयपूर (राजस्थान) येथे काँग्रेसच्या तक्रारीवरून भगवे झेंडे हटवले !

दुसरीकडे राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हिंदु संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तेथे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असले, तरी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासन निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असून काँग्रेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी जयपूरमध्ये ठिकठिकाणी लावलेले भगवे झेंडे हटवले आहेत. विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा पुतळा जाळून या कारवाईचा निषेध केला आहे. काँग्रेस पक्षाचा निवडणुका आणि रामनाम यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे हिंदू संघटनांनी सांगितले.

जयपूर शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास यांनी अधिवक्ता मंगल सिंह यांच्या माध्यमातून जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून ‘वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाला लाभ व्हावा, यासाठी परकोटाच्या बाजारपेठेत भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे’, असे त्यात म्हटले आहे.

यानंतर महापालिकेने रातोरात झेंडे उतरवले. हवामहलचे आमदार बालमुकुंदाचार्य यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून ध्वज परत लावण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का  ?