रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असलेल्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४० वर्षे) यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.
इक्ष्वाकु राजा सगर, पराक्रमी, शूर अन् थोर ।
रघुवंशाची कीर्ती अपार, तयाचे वंशज श्रीरघुवीर ।। धृ. ।।
दशरथास नसे संतान, त्यामुळे तिन्ही राण्या होत्या खिन्न ।
दुःखाचे करण्या निवारण, दशरथाने केले यज्ञ अनुष्ठान ।। १ ।।
अग्निदेव झाला प्रसन्न, दशरथास दिले वरदान ।
राण्यांनी हर्षित होऊन, केला दिव्यप्रसाद ग्रहण ।। २ ।।
चैत्रनवमीचा शुभदिन, पहाता पहाता झाली मध्यान् ।
आला आनंदाचा क्षण, झाला प्रभु रामाचा जन्म ।। ३ ।।
राम, लक्ष्मण, भरत, रिपुदमन (टीप १), चार ज्योती दीप्तीमान ।
झाली पृथ्वी प्रकाशमान अन् सजली वैकुंठासमान ।। ४ ।।
यज्ञोपवीत करूनी धारण, झाले गायत्री मंत्राचे उच्चारण ।
पाहुनी बटु रघुनंदन, कौसल्येला बाल वामनाचे झाले स्मरण ।। ५ ।।
चौघांचे झाले उपनयन, जणू लाभले नवजीवन ।
मातापित्यांना सोडून, त्यांनी केले गुरुगृही गमन ।। ६ ।।
ब्रह्मचर्यव्रत करूनी धारण, त्यांनी केले कठोर धर्माचरण ।
संपले सारे बालपण, आरंभले शिष्याचे जीवन ।। ७ ।।
श्री गुरुचरणी करूनी नमन, केले प्रत्येक गुर्वाज्ञेचे पालन ।
करूनी सकल ज्ञान अर्जन, झाले परम ज्ञानसंपन्न ।। ८ ।।
अयोध्यानगरी फुलांनी सजवून, जमले सारे अयोध्याजन ।
आसुसले प्रजाजनांचे मन, पहाण्या श्रीराम-लक्ष्मण ।। ९ ।।
पाहुनी श्री रघुनंदन, दशरथाचे विसावले अंतर्मन ।
घेऊनी श्रीरामाचे दर्शन, सजल झाले त्यांचे नयन ।। १०।।
पिता पाही डोळे भरून, माता भरवी सुग्रास भोजन ।
पुत्रभेटीचा सुवर्ण क्षण, ‘कसे होईल माता-पित्याचे समाधान ?’ ।। ११ ।।
आले ऋषी विश्वामित्र, नेण्या जेष्ठ दशरथपुत्र ।
राजा झाला गलितगात्र, म्हणे ‘कसे पाठवू सुकुमार राजपुत्र ?’ ।। १२ ।।
कुलगुरु वसिष्ठांनी, सांगितले राजाला समजावूनी ।
संगे रामलक्ष्मण घेऊनी, चालले विश्वामित्र मुनी ।। १३ ।।
घनदाट दंडकवन, राक्षसांनी घातले थैमान ।
धर्माचे करूनी हनन, राक्षस करती मनुष्यमांस भक्षण ।। १४ ।।
रक्तमांस हाडे फेकुनी, बंद पाडले यज्ञहवन ।
‘हे दशरथनंदन, तू कर आता असुरांचे निर्दालन !’ ।। १५।।
विश्वामित्रांचे बोल ऐकून, सज्ज झाले श्रीराम आणि लक्ष्मण ।
ऋषिमुनींचे करण्या रक्षण, त्यांनी केले मारक रूप धारण ।। १६ ।।
करूनी धनुष्यावर बाणाचे संधान, श्रीराम झाले सावधान ।
सोडुनी लक्षवेधी अचूक रामबाण, घेतले त्राटिकेचे प्राण ।। १७ ।।
वधले सुबाहु अन् त्याचे सैन्य, मारीच राक्षस गेला पळून ।
मुक्त झाले दंडकारण्य, झाले ऋषिमुनींचे रक्षण ।। १८ ।।
स्वयंवर करण्या संपन्न, मिथिलेस यावे मुनीजन ।
जनकाचे पत्र वाचून, विश्वामित्राने स्वीकारले निमंत्रण ।। १९।।
श्रीरामाने गौतमाश्रमात पदार्पण करूनी,
घेतली अहिल्येची कथा जाणूनी ।
मनी करुणा आली दाटूनी आणि व्यथित झाले श्रीराम मनोमनी ।। २० ।।
श्रीरामाने शिळेला पदस्पर्श केला आणि साध्वी अहिल्येचा उद्धार केला ।
अहिल्या शापमुक्त होऊनी, गेली भवसागर तरूनी ।। २१ ।।
भगीरथाचे तप घनघोर, गंगा अवतरली पृथ्वीवर ।
पापी जिवांचा करण्या उद्धार, हेच होते भागीरथीचे सार ।। २२।।
प्रभु आले गंगा किनारी, नमन करूनी गेले पैलतिरी ।
मग आली मिथिला नगरी, ती जनकराजाची पुण्यनगरी ।। २३।।
मिथिलेची राजकुमारी, सीता परम सुंदरी ।
ती असामान्य दैवी नारी, वाढली जनकाच्या घरी ।। २४।।
राजाच्या सुंदर उद्यानात, तेथील गिरिजाकुमारीच्या मंदिरात ।
देवीचे करण्या पूजन, आली सीता सखींना घेऊन ।। २५।।
श्रीराम आले उपवनात, गुंग झाले पुष्प तोडण्यात ।
सीता येताच उद्यानात, श्रीराम गढून गेले तिला पहाण्यात ।। २६।।
पाहून राजीवलोचन, सीता गेली शुद्ध हरपून ।
जानकी सुंदर अन् शालीन, तिला पहाताच जडले रामाचे मन ।। २७।।
सीतेचे हरपले भान, लाजली पाहुनी श्री रघुनंदन ।
मूकपणे बोलले सुनयन, ‘तुम्हाला वरते मी मनोमन’ ।। २८ ।।
सीतेने केले गौरीपूजन, देवीने दिले आशीर्वचन ।
रामाने केले शिवस्मरण, मिळाले कामनापूर्तीचे वचन ।। २९ ।।
भरला जनकाचा राजदरबार, जमले अनेक राजे परम वीर ।
‘जो प्रत्यंचा चढवील धनुष्यावर, तोच जिंकेल सीतेचे स्वयंवर’ ।। ३० ।।
घोषणा ऐकूनी राजकुमार, धनुष्य उचलण्या आले समोर ।
शक्तीचा लावूनी जोर, धनुष्य हलले न कणभर ।। ३१ ।।
प्रण अपूर्ण राहिल्याचे पाहून, जनक बोलले निराश होऊन ।
‘अपूर्ण राहील का माझा प्रण ? वरमाला जाईल का सुकून ?’।। ३२ ।।
ऐकूनी राजाचे वचन, विश्वामित्राने केले निवेदन ।
श्री गुरूंना करून भाववंदन, रामाने स्वीकारले आव्हान ।। ३३ ।।
श्रीरामाने शिवधनुष्य उचलले, प्रत्यंचा चढवतांना ते धनु भंगले ।
त्या नादाने आकाश दणाणून गेले, शिवशंभो प्रसन्न झाले ।। ३४ ।।
श्रीरामाने प्रण जिंकला, श्रीरामाचा जयजयकार झाला ।
मोद ओसंडूनी वाहू लागला, जनकाला ब्रह्मानंद झाला ।। ३५ ।।
सीतेचे स्वयंवर झाले, वैदेहीने श्रीरामाला वरले ।
चारही राजकुमारांचे विवाह झाले (टीप २),
जनकाने कन्यादान केले ।। ३६ ।।
जनकपुरीहून अयोध्येला आल्या, दशरथाला ४ पुत्रवधु लाभल्या ।
कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, या राण्याही हर्षित झाल्या ।। ३७ ।।
टीप १– रिपुदमन म्हणजे शत्रूंचे दमन करणारा. शत्रुघ्नला ‘रिपुदमन’ही म्हणत होते.
टीप २ – रामाच्या भावांचा विवाह सीतेच्या बहिणींबरोबर एकाच वेळी झाला.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२४)