उतारवयातही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १४ एप्रिल २०२४ या दिवशी केली. १५.४.२०२४ या दिवशी नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा (टीप) आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

टीप – सहस्रचंद्रदर्शन सोहळा : व्यक्तीने ५० व्या वर्षात पदार्पण केले की, तिच्या शरिराची क्षमता न्यून होत जाते. ‘ती वाढण्यासाठी देवतांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी वयाच्या ५० व्या वर्षापासून प्रत्येक ५ वर्षांनी शांतीविधी करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे. व्यक्तीने ८० व्या वर्षात पदार्पण केल्यावर ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा शांतीविधी करण्यात येतो.

श्रीमती मालती ठोंबरे यांना सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

श्रीमती मालती ठोंबरे

१. सौ. ज्योती पंडित (श्रीमती मालती ठोंबरे यांची मुलगी), नाशिक

१ अ. खडतर जीवन : ‘लहानपणापासून आईचे जीवन पुष्कळ खडतर होते. पतीची भक्कम साथ मिळाल्यामुळे ती आनंदाने संसार करत होती. नणंदा, भाचे आणि भाच्या यांचे तिला पुष्कळ करावे लागायचे. ती सर्वांचे प्रेमाने करायची.

१ आ. परिस्थिती स्वीकारणे : या वयातही तिला घरातील चार व्यक्तींचा स्वयंपाक करावा लागतो, तसेच घरातील इतर कामांमध्येही साहाय्य करावे लागते. ‘हे माझे प्रारब्ध आहे. मला ते स्वीकारायलाच हवे’, असे म्हणून ती आनंदाने सर्वकाही करते. जीवनातील अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत ती स्थिर आणि शांत असते.

सौ. ज्योती पंडित

१ इ. इतरांचा विचार करणे : एकदा आई पुष्कळ आजारी होती. आम्ही तिला नाशिकहून चारचाकी गाडीने धुळ्याला घेऊन जात होतो. ‘तिचे रस्त्यात काहीही होऊ शकते’, अशी स्थिती असतांना ती आम्हा भावंडांना ‘तुम्ही काही खाल्लेत का ? पाणी घेतलेत का ?’, असे विचारत होती.

१ ई. शिकण्याची वृत्ती : आईला ‘अँड्रॉइड भ्रमणभाषची हाताळणी कशी करावी ?’, हे ठाऊक नव्हते; परंतु या वयातही तिने ते उत्साहाने शिकून घेतले. कोरोना महामारीच्या काळात सत्संगात रहाता आले पाहिजे आणि इतरांवर अवलंबून रहायला नको; म्हणून कोरोनाच्या आरंभीच तिने साधनेसाठी आवश्यक तेवढ्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या.

१ उ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : आई व्यष्टी साधना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. ती नियमित व्यष्टी साधनेचा आढावा देते. ती नियमितपणे सारणी लिखाण करते. ‘सत्संगात चूक सांगणे आणि क्षमायाचना करणे’, या कृती करण्यात ती नेहमी पुढे असते. सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमधील साधनेसाठी आवश्यक असणारी सूत्रे ती वहीत लिहून ठेवते.

१ ऊ. सेवेची तळमळ

१ ऊ १. सतत सेवारत रहाणे : ती गेल्या २१ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तिला अनेक अनुभूती आल्या आहेत. विविध सेवांमध्ये तिचा सहभाग असतो. आताही ती घरातील सर्व आवरून जमेल तशी सेवा आनंदाने करत आहे. आता तिचे वय झाले आहे. तिचा एक पाय दुखत असल्याने तिला चालतांना त्रास होतो, तरीही ती थांबत थांबत हळूहळू जाऊन फलकलिखाणाची सेवा करते. ‘देहाचे जे व्हायचे असेल, ते गुरुसेवेत होऊ दे’, असे ती म्हणत असते.

१ ऊ २. साधकांना सेवा करण्यास प्रेरणा देणार्‍या ठोंबरेआजी ! : साधकांना सेवेला जाण्याचा कंटाळा आला अथवा थोडेफार दुखत असेल आणि ‘सेवेला जाऊ नये’, असे वाटत असेल, तेव्हा त्यांना ठोंबरेआजींची आठवण होते आणि ‘आजी या वयातही पुष्कळ शारीरिक त्रास असतांना सेवा करत असतात’, हे लक्षात येऊन त्यांना उत्साह येतो. ते म्हणतात, ‘‘आजींचा उत्साह बघून आमची आम्हालाच लाज वाटते आणि आम्ही सेवेला बाहेर पडतो.’’

१ ए. कर्तेपणा गुरूंना अर्पण करणे

१. आईच्या सुना आणि नातवंडे नेहमी म्हणतात, ‘‘आजींच्या हाताला चव आहे.’’ तेव्हा ती म्हणते, ‘‘हे सर्व करण्यासाठी मी असमर्थ आहे. गुरुदेवांनी मला हात दिले आहेत. उभे रहाण्यासाठी पाय दिले आहेत. ते सर्वकाही करत असतात. मला तर काहीच कळत नाही. मी अशीच वेडी गबाळी आहे.’’

२. या वयातही तिचे अक्षर पुष्कळ सुंदर आहे. महाविद्यालयातील तरुण मुले थांबून आवर्जून तिने लिहिलेले साधनेविषयीचे फलक वाचतात आणि तिच्या हस्ताक्षराचे कौतुक करतात. तेव्हा ती गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. ‘श्री गुरु मला शक्ती देतात. तेच माझ्याकडून सर्वकाही करून घेतात’, असा तिचा भाव असतो.

१ ऐ. भाव : तिचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती तिच्या खोलीत असलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथासमोर उभी राहून त्यांना मनातील सर्वकाही सांगत असते.

‘गुरुदेवांच्या कृपेनेच असे विविध गुण असलेली आई आम्हाला लाभली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. अविनाश पंडित (श्रीमती मालती ठोंबरे यांचे जावई, वय ६५ वर्षे), नाशिक

श्री. अविनाश पंडित

२ अ. गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर कठीण प्रसंगातही स्थिर रहाणे : ‘काही वर्षांपूर्वी श्रीमती ठोंबरे नेपाळ येथे यात्रेसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची प्रकृती अकस्मात् बिघडली. त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनीसुद्धा होत्या. आजींची स्थिती पाहून ‘त्या घरी सुखरूप परत जातील का ?’, याविषयी त्यांच्या मनात भीती होती. अशा कठीण परिस्थितीत आजी आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय करत होत्या. ‘गुरुदेवांना जसे अपेक्षित असेल, तसे होईल. कुणीही काळजी करू नका’, असे त्या इतरांना सांगत होत्या. ईश्वराच्या कृपेने त्या सुखरूप घरी परत आल्या. परतल्यानंतरही सहप्रवासी त्यांना संपर्क करून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत होते.

‘परमेश्वरकृपेने त्यांना साधनेतील आनंद मिळून त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, हीच प्रार्थना ! ‘श्री गुरुमाऊलीच्या कृपेने हे लिखाण सुचले आणि त्यांनीच ते लिहून घेतले’, याबद्दल कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ११.४.२०२४)