‘सनातन प्रभात’चा ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, हा आग्रह योग्यच !

श्री. राजेंद्र भोबे

सर्वप्रथम ‘सनातन प्रभात’ या दैनिकाने २५ वर्षे पूर्ण केल्याविषयी अभिनंदन ! आजच्या व्यापारीकरणाच्या युगात केवळ आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्काराचे विषय घेऊन एखादे दैनिक चालवणे हे कठीण असूनही दैनिक ‘सनातन प्रभात’ने गेली २५ वर्षे स्वतःचा मूळ उद्देश न सोडता आध्यात्मिक विषयांची कास धरून आपल्या हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, सण, उत्सव यांचे महत्त्व सांगितले, तसेच सात्त्विक विषयांवर मार्गदर्शन केले आहे. आजची पिढी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारी आहे. ‘सनातन प्रभात’ आतापर्यंत आध्यात्मिक विषयांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करत आलेले आहे. यापुढेही ते नावीन्यपूर्ण रितीने असे करू शकते, असे मला प्रकर्षाने वाटते. आजच्या तरूण पिढीला विज्ञान आणि आध्यात्मिक उपाय यांचे मार्गदर्शन झाले, तर त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते उपयोगी ठरेल.

‘सनातन प्रभात’विषयी सांगायचे झाले, तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्भीडपणे दिली जाणारी वृत्ते ! आपल्या हिंदु धर्मातील सण, उत्सव यांविषयी जसे हे दैनिक मार्गदर्शन करते, तसेच धर्म आणि संस्कृती यांची टिंगलटवाळी करणार्‍यांवरसुद्धा ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे शास्त्रशुद्ध रितीने विवेचन करून त्याचे खंडन करते. हिंदु धर्म आणि हिंदु व्यक्ती यांच्यावर देश आणि विदेशांतून होणार्‍या आक्रमणांविषयी ‘सनातन प्रभात’ निर्भीडपणे बातम्या छापून आणते. अशी वृत्ते इतर वृत्तपत्रांत दिली जात नाहीत. २५ वर्षे वृत्तपत्र चालवणे आणि आर्थिक दृष्टीने हानी सोसून न डळमळता चालवणे, हे कित्येकांना जमत नाही अन् मग ते व्यापारीकरणाच्या मागे लागतात. तसे न करता ‘सनातन प्रभात’ने गेली २५ वर्षे वृत्तपत्र चालवले. विविध जातीधर्मांतील साधक ‘सनातन प्रभात’चा प्रचार करतात. यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा !

हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ हिंदूंचे राष्ट्र नव्हे, तर विचारांचे आणि रितींचे राष्ट्र ! ज्याला आपण रामराज्य म्हणतो तसे आहे. रामराज्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही. आपला व्यवसाय आणि दैंनदिन गोष्टी करतांना ईश्वराचे स्मरण आणि साधना हिंदु राष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. हे विचार ‘सनातन प्रभात’मधून नेहमी मांडले जातात आणि ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. हिंदु राष्ट्र आले म्हणून त्याच्या विरोधी कुणी बोलायला पाहिजे, असे मला वाटत नाही. ‘सनातन प्रभात’चा ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असा आग्रह असतो, त्याविषयी माझे दुमत नाही.

– श्री. राजेंद्र भोबे, सनदी लेखापाल, पणजी, गोवा.