श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून विद्यार्थ्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा महायुतीचा आरोप !

 संस्थाचालक आणि प्राचार्यांसह महायुतीचे नेते

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून एका महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे, तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाला धारेवर धरले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची धमक नसल्यानेच महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांवर आरोप करत महायुतीच्या नेत्यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांना सुनावले.

माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील यांच्याकडे शिवाजी पेठ येथील ‘न्यू कॉलेज’मधील कर्मचारी आणि विद्यार्थी यांवर शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचार करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी यांना एक विशिष्ट अर्ज देऊन मतदारसंघातील त्यांचे नातेवाईक आणि संपर्क आणण्याच्या सूचना कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती, महायुतीच्या पदाधिकार्‍यांना मिळाली होती. त्यावरून महायुतीच्या नेत्यांनी १२ एप्रिलला महाविद्यालयात जाऊन प्राचार्य आणि संस्थाचालकांना जाब विचारला.

एक व्यक्ती महाविद्यालयातील कर्मचार्‍यांवर दबाव टाकत आहे. कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी जमा केलेले अर्ज पोलिसांकडे द्यावेत. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अन्यथा महाविद्यालयाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, अशी चेतावणी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी दिली.