अत्यंत प्रतिकूल स्थितीतील ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या वर्तनातील वैविध्य !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे इह अन् परलोक यांतील कल्याण अनुभवणे 

‘प.पू. गुरुदेवांना त्यांच्या देवतातुल्य माता-पित्याकडून जी संस्कारांची पक्की शिदोरी मिळाली, तीच महापुरुष होण्याच्या रस्त्याची पहिली पायरी ठरली. मातोश्रींच्या रूपात स्त्रीधर्म, पतीव्रताधर्म, आचारधर्म आणि त्यातून साधले गेलेले इह अन् परलोक यांतील कल्याण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. वडिलांच्या सान्निध्यात राहून निष्काम कर्मयोग कसा आचरतात, हे त्यांनी प्रत्यक्ष बघितले.

२. अलिप्ततेने साक्षीत्वाने पार पाडलेले कर्मच सात्त्विक होते !

कर्माचे स्वरूप नियत, शास्त्रशुद्ध असेल, तरच ते सात्त्विक कर्म ! वर्‍हाडचे शास्त्रीबुवा अग्रगण्य योगी आणि कर्मठ अन् ज्ञानी होते. त्यांची तिन्ही वेळची संध्या, पूजन कधी चुकत नसे. काशीचे लक्ष्मणशास्त्री द्रविड अकोल्यात आले होते. शास्त्रीबुवांसमवेत त्यांचे बोलणे बराच वेळ चालू होते. योगासंबंधीही बोलणे चालू होते. दोघेही ज्ञानी. शास्त्रीबुवांचे माध्यान्ह स्नान राहिले. वेळ टळून दीड घंट्यापेक्षा अधिक वेळ झाला होता. बोलणे संपेपर्यंत शास्त्रीबुवा स्वस्थ होते. लक्ष्मणशास्त्री गेले. नंतर त्यांनी स्नान करून आन्हिक उरकले. नेमाची वेळ टळली; म्हणून शास्त्रीबुवा अस्वस्थ झाले नाहीत. नित्यकर्मात, नेमातही आसक्ती नको. सत्कर्म, धर्म-कर्माचीही ओढ नको. शुभकर्माचीही अनासक्ती. कुठेच आसक्ती नाही.

जे ज्या वेळी जसे प्राप्त होईल, ते तसे अलिप्ततेने साक्षीत्वाने पार पाडणे, ही कर्मे करण्याची कला साधली की, ते कर्म बद्ध करत नाही. सात्त्विक कर्म, शुभ कर्माची, नित्य कर्माची, नेमाची जर आसक्ती असेल, तर ते सात्त्विक कर्म व्हायचे नाही. शुभ आणि अशुभ यांच्या पलीकडे जायचे.

मृत्यूला सामोरे जाण्यात ज्ञानी आणि अज्ञानी व्यक्ती यांच्यातील भेद

‘मृत्यू अपरिहार्य आहे; पण ज्ञानी व्यक्ती समोरचे प्रारब्ध जाणून साक्षी बनून शांतपणे प्रसन्नतेने त्याला सामोरे जातो. अज्ञानी व्यक्ती मात्र व्याकूळ होतो. मृत्यूशी लढायला जातो, बेचैन असतो, मरण टाळण्यासाठी कसोशी (प्रयत्न) करतो आणि मृत्यूच्या वेळी होणारे दुःख, पीडा भोगतो अन् शेवटी हरतो. त्यानंतर पुढे काय ? पुढे नरक यातना ! मग पुन्हा पुनरागमन, पुन्हा वासनेनुसार जन्म. तामसी असेल, तर कीटक, पतंग, पशू, पक्षी आणि सात्त्विक असेल तर मनुष्य जन्म ! असे हे जन्म-मरणाचे चक्र सतत फिरत असते. भक्त-योगी मात्र या मानवी जीवनाचा अवसर (संधी) साधतो. अंतःकरण परमशुद्ध बनवतो. भगवंताच्या प्रकटीकरणाला अनुकूल स्थान करतो. पूर्णत्वाचा टप्पा, अंतिम साक्षात्कार जरी या जन्मात न साधला, तरी त्याचे पुढचे पाऊल पुढेच पडते. शास्त्रीबुवा आणि त्यांच्या पत्नी यांचा मृत्यू ज्ञानियांचा व्हावा तसाच झाला. त्यांच्या मृत्यूचे वर्णन ऐकावे आणि मन पवित्र करावे.
(साभार : मसिक ‘घनगर्जित’, मार्च २०१९)

३. ज्ञानी व्यक्तींचा प्रारब्ध आणि मृत्यू यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

ज्ञानी व्यक्ती प्रारब्ध निमूटपणे भोगून संपवतो. प्रकृतीच्या गुणांशी तो झगडत नाही, भांडत नाही, जे घडते, ते घडू देतो. अन्यथा घडावे, असे इच्छित नाही. शांतपणे सगळे सहन करतो. नियती जशी असेल तशी स्वीकारतो; म्हणूनच शास्त्रीबुवांनी त्यांच्या पत्नीचा अकालमृत्यू शांतपणे स्वीकारला. त्या वेळी त्यांना उत्तम गती मिळावी; म्हणून विष्णुसहस्रनामाचा पाठ उच्च स्वरात केला. पाठ चालू असतांना जरी पत्नीचे प्राणोत्क्रमण झाले, तरी त्यांनी पाठ शांतपणे स्थितप्रज्ञवृत्तीने पूर्ण केला. मृत्यू अपरिहार्य आहे. जन्म आहे, तिथे मृत्यू आहे. ज्ञानी व्यक्ती मरतो आणि अज्ञानीही !

४. ज्ञानी व्यक्ती मृत्यूचे स्वागत करते !

मृत्यू म्हणजे नवजीवन ! फाटलेले वस्त्र टाकून द्यावे, तसे जीर्ण शरीर मृत्यू हिरावून घेतो आणि नवे देतो, अशी ज्ञानियांची धारणा असते. त्यामुळे तो मृत्यूचे स्वागत करतो. जीवनात लहान, मोठी दुःखे, आपत्ती, संकटे प्रत्येक क्षणी येतात. ज्ञानी आणि अज्ञानी दोघांनाही तोंड द्यावे लागते. आपत्तीत अज्ञानी व्याकूळ होतो. ज्ञानी प्रसन्न असतो. अरण्यवास करायला निघालेल्या रामाच्या मुखकांतीप्रमाणे त्याची मुखकांती प्रसन्न असते. प्रकृतीनुसार नियतीप्रमाणे प्रारब्धानुसार सगळे घडत असते. ज्ञान्याला जाणीव असते, अज्ञानी अजाण असतो. अजाण असल्यामुळे तो (अज्ञानी) दुःखी असतो ! वरील ज्ञानियाच्या मृत्यूचे वर्णन शास्त्रीबुवांच्या पुण्यपावन मृत्यूला तंतोतंत लागू पडते.

५. अज्ञानी व्यक्तीचे मरणे ! 

अकोल्याचे शास्त्रीबुवा हे विदर्भ सनातनधर्म सभेचे अध्यक्ष ! त्यांचा मृत्यू आठवतो. सगळी आवराआवर त्यांनी केली आणि निश्चिंतपणे प्रसन्न मुद्रेने त्यांचा मृत्यू झाला. जणू कुणाचा निरोप घ्यावा, असे त्यांचे मरण होते. असे ज्ञानी व्यक्तींचे मरण असते; परंतु अज्ञानी झगडेल. विरोध करील, डॉक्टर धुंडाळेल, नाना उपाय आणि तोडगे काढील; कारण तो अशांत असतो, व्यग्र असतो. अज्ञानी मरतो; तो पण निरूपायाने मरतो. अनिच्छेने, दुःखाने मरतो आणि पुन्हा जन्म घेतो.

६. शास्त्रीबुवांच्या इच्छेनुसार केलेली अंत्येष्टी ! 

मृत्यूनंतर शास्त्रीबुवांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कलेवराला मंदिरासभोवती ११ प्रदक्षिणा घालून मगच अंत्येष्टी करण्यात आली. मृत्यूसमयी त्यांची संन्यास घेण्याची इच्छा होती. पंचक्रोशीतील प.प. (परमहंस परव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी हे इंदूरकडे असल्याने त्यांची संन्यासदीक्षेची इच्छा अपूर्णच राहिली; परंतु वाजत गाजत, भजन गात त्यांच्या कलेवराला ११ प्रदक्षिणा घालून मगच त्यांच्या इच्छेनुसार अंत्येष्टी करण्यात आली.

स्वतःचा मृत्यू आठवल्यास अहंकार पूर्णपणे निवृत्त होऊन शरणागतीकडे वाटचाल चालू होणे

‘प्रतिदिन माणसे मरतात. मी मात्र कधीच मरणार नाही’, अशीच सर्वांची धारणा आहे. हेच सर्वांत मोठे आश्चर्य ? प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी मृत्यूचे महात्म्य जाणले होते आणि म्हणूनच एकदा लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असलेल्या एक ध्येयनिष्ठ अन् कर्तृत्ववान डॉक्टरांनी त्यांच्या उत्तर आयुष्यात मोठ्या तळमळीने प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘महाराज, आता तशी कोणतीही चिंता मनात नसतांना माझे मन देवाकडे का लागत नाही ?’’ गुरुदेव शांतपणे म्हणाले, ‘‘स्वतःचा मृत्यू आठवावा !’’ या केवळ ३ शब्दांनी एका क्षणात त्या डॉक्टरांचे जीवन पालटले. पूर्वायुष्यातील ध्येयनिष्ठेचा आणि कर्तृत्वाचा अहंकार हा स्वतःच्या नसण्याविषयीच्या विचाराने ढासळायला लागला. हळूहळू अहंकार पूर्णपणे निवृत्त होऊन त्यांची शरणागतीकडे वाटचाल चालू झाली. अखेर त्या डॉक्टरांचा मृत्यू मंगलमय झाला.’
(साभार : मसिक ‘घनगर्जित’, मार्च २०१९)

७. संतांच्या देहत्यागाचे वैशिष्ट्य !

प.प. श्रीधरस्वामी एकांतात असतात. कर्नाटकात वरदहळ्ळीला ते देहत्याग करतात. त्यांचा देहत्याग त्यांच्या जवळच्या शिष्यालाही कळत नाही. देहत्याग झाल्यानंतर कळते. मग सहस्रो लोक गोळा होतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांसारखे ज्ञानेश्वर योगी संजीवनी समाधी घेतात ! समर्थ रामदासस्वामी आधीच सूचना देऊन दासनवमीला ठरवलेल्या वेळी देहत्याग करतात. संत एकनाथ नाथषष्ठीला सांगून सवरून गोदावरीत जलसमाधी घेतात. अकस्मात् मृत्यू आला, तरी ज्ञानी डगमगत नाही. ते सावध आणि प्रसन्न असतात. हर्षाने मृत्यूचे स्वागत करतात.

सार हेच की, जीवनात लहान-मोठी दुःखे, आपत्ती, संकटे वेळोवेळी येतात. अशा या सुख-दुःखांना ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही तोंड द्यावे लागते. आपत्तीत अज्ञानी व्याकूळ होतो; पण ज्ञानी प्रसन्न असतो.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१९)