अधिकचे पाणी घेऊनही पुणे शहरांतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत !

प्रतिकात्मक चित्र
  • ४ दिवसांमध्ये ४०० तक्रारींची नोंद
  • पाण्यासाठी नागरिकांचा कोट्यावधी रुपयांचा व्यय

पुणे – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढत आहे; परंतु उपलब्ध पाणीसाठा आणि मागणी याचा ताळमेळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला घालणे जमत नसल्याने शहरांत पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये पाण्याविषयीच्या ४०० तक्रारींची नोंद पाणीपुरवठा विभागाकडे झाली असून तक्रारींचे प्रमाण ३५ ते ४० टक्के इतके आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १ सहस्र ७०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. गेल्या २० दिवसांपासून महापालिका प्रतिदिन ८० ते १०० दशलक्ष लिटर अधिकचे पाणी धरणातून घेत आहे. तरीही पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

उंड्री, पिसोळी परिसरातील २७ वसाहतींतील रहिवाशांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी न भरण्याची चेतावणी दिली आहे. गेल्या ९ वर्षांपासून येथील ५ सहस्र सदनिकांना पाण्यासाठी प्रतिमास ३ ते १० सहस्र रुपयांचा खर्च करावा लागत आहे. या २७ वसाहतींनी मिळून आजपर्यंत १०० कोटी रुपये केवळ पाण्यासाठी व्यय केले आहेत.

संपादकीय भूमिका :

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी नागरिकांना खर्च करावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !