मुंबई – नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपिठाने रश्मी बर्वे यांची याचिका फेटाळली. रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रहित ठरवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रहित केला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने जातवैधता प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली; परंतु निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. यावर रश्मी बर्वे सर्वाेच्च न्यायालयात गेल्या होत्या.