सनातनच्या साधिका सौ. लीला निंबाळकर यांना ‘सातारारत्न’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

सनातनच्या साधिका सौ. लीला निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार प्रदान करताना डॉ. (सौ.) श्रद्धा जवंजाळ आणि उपस्थित मान्यवर

सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका सौ. लीला अरुण निंबाळकर यांना ‘सातारारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संघटनेच्या वतीने एका कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश धनंजय सकुंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

येथील समर्थ मंदिर परिसरातील दैवज्ञ मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माहिती अधिकार, पोलीस प्रशासन, पत्रकार, सामाजिक आणि राजकीय, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सकुंडे यांनी संघटनेची वाटचाल, संघटनेची ध्येय-धोरणे यांविषयी उपस्थितांना अवगत केले. नंतर मान्यवरांना ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्र, धर्म, अध्यात्म, तसेच राजकीय आणि सामाजिक विशेष योगदानाविषयी माजी नगरसेविका तथा सनातनच्या साधिका सौ. लीला अरुण निंबाळकर यांना ‘सातारारत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘सातारारत्न’ पुरस्कार सच्चिदानंद परब्रह्म यांच्या चरणी अर्पण ! – सौ. लीला अरुण निंबाळकर

पुरस्काराला उत्तर देताना सौ. लीला निंबाळकर म्हणाल्या,‘‘मी जी काही आहे, ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळेच आहे. मी गत २५ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. त्यानुसारच माझी राष्ट्रीय, धार्मिक, आध्यात्मिक, तसेच राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी हा पुरस्कार मी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते ! सर्व ‘साधक रत्नां’ची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी प.पू. गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते !