स्वदेशीचा दणका !

यंदा होळीचा व्यवसाय ५० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे; परंतु देशातील नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीला प्राधान्य दिल्याने चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका बसला आहे, असे व्यापारी संघटना ‘कॅट’ने (‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया’ने) सांगितले आहे. प्रतिवर्षी होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल आदी वस्तू चीनमधून आयात केल्या जाणार्‍या वस्तूंमुळे चीनला त्याचा लाभ होतो. आता ‘व्होकल फॉर लोकल’ला (स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याला) भारतियांनी पाठिंबा दिल्याने देशातील व्यापार्‍यांना त्याचा लाभ होत आहे.  भारत-चीन संबंध तणावपूर्णच आहेत. त्यामुळे भारतियांनी चिनी मालावर बहिष्कार घालून चीनला चपराकच लगावली आहे. भारत शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणामुळेही भारतियांमध्ये स्वदेशीप्रेम जागृत होऊ लागले आहे, ही आनंददायी गोष्ट आहे. आज भारतीय बाजारपेठेत लहान मुलांची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, जीवनावश्यक वस्तू, भ्रमणभाष यांची रेलचेल प्रचंड वाढली आहे.

अनेक सण-उत्सवांच्या वेळी भारतीय बाजारपेठ चिनी मालाने अक्षरश: भरून जाते. दिवे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पिचकार्‍या, बंदुका, लहान मुलांची खेळणी इत्यादींचे प्रमाण यात अधिक असल्याने बराचसा चिनी माल भारतात खपतो. चिनी माल खरेदी करण्याचे प्रमाणही अधिक असल्याने अनेक नवीन चिनी बनावटीच्या वस्तू भारतीय बाजारपेठेत येत असतात. गुणवत्तेचा विचार केल्यास चिनी उपकरणे स्वस्त असली, तरी फारच अल्प दर्जाची असल्याने लवकर खराब होतात, असे लक्षात येते. त्याउलट भारतीय बनावटीच्या वस्तूंचे मूल्य अधिक असले, तरी गुणवत्ता चांगली असल्याने ती अधिक कालावधी टिकतात. चिनी मालामध्ये प्लास्टिकचा वापर अधिक प्रमाणात केलेला असतो. प्लास्टिकचे विघटन होत नाही. चीनमधील टाकाऊ प्लास्टिकवर प्रक्रिया करून चिनी बनावटीची खेळणी, तसेच अन्य उपकरणे बनवली जाऊन तो माल भारतीय बाजारपेठेत येतो. त्यामुळे अशी खेळणी खरेदी करणे, म्हणजे चीनमधील कचरा विकत घेऊन लहान मुलांच्या हाती देण्यासारखे आहे ! चिनी मांजासारख्या घातक वस्तूंमुळे प्राणी, पक्षी यांना मोठ्या प्रमाणात हानी होते. काही व्यक्तींचे गळे कापले जाऊन ते घायाळ किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. बाजारपेठेवर कब्जा करण्यापर्यंत हा भाग मर्यादित नाही. चीन अरुणाचल प्रदेशवर स्वत:चा दावा सांगतो. भारतातील शहरांची नावे परस्पर पालटतो. भारताचा भूभाग आणि बाजारपेठ धूर्त चीन गिळंकृत करू पहाणार्‍या चीनशी २ हात करण्यासाठी केवळ सैन्याने लढायला जाण्याची आवश्यकता नाही, तर भारतीय चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या माध्यमातूनही चीनला वठणीवर आणू शकतात, यामुळे सैन्याला मोठा हातभारही लागेल !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.