‘चैत्र शुक्ल प्रतिपदा (९.४.२०२४) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. वर्ष २०१९ पासून सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सिंधुदुर्ग येथील साधकांना सत्संग आणि मार्गदर्शन लाभत आहे.
सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी ६१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रीती
‘एकदा दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु दादा त्यांच्या घरी निवासाला असतांना त्यांनी स्वतः बनवलेल्या करंज्या साधकांना दिल्या. साधक सद्गुरु दादांच्या घरी गेल्यास सद्गुरु दादा साधकांचे स्वागत करण्यासाठी स्वतःहून पुढे येतात. ते साधकांना बसायला आसंदी देतात. साधकांकडून चुका झाल्यास त्यातून शिकून पुढे जाण्यासाठी ते साधकांना संधी देतात.
२. गुरुकार्याचा ध्यास
एकदा सद्गुरु सत्यवान कदम त्यांच्या ‘आरे’ येथील मूळ घरी काही दिवस निवासाला होते. त्या वेळी त्यांचा मोठा भाऊ रुग्णाईत होता. तेव्हा ‘त्या भागातील गुरुकार्य वाढवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी त्यांचे साधकांच्या समवेत नियोजन असे. ते प्रतिदिन वैयक्तिक संपर्क करण्यासाठी जात होते.
३. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांनी नियोजन करणे आणि त्यांचा संकल्प’ यांमुळे अनेक अडचणींवर मात होऊन ‘ऑनलाईन’ सत्संगातील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा होणे
एप्रिल २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ऑनलाईन’ सत्संगातील जिज्ञासूंसाठी प्रत्यक्ष सत्संग सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी सत्संगसेवक आणि जिज्ञासू यांना कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास अडचणी येत होत्या. केवळ ३ सत्संगसेवक प्रत्यक्ष सेवेत २ दिवस सहभागी होऊ शकले. सत्संग सोहळ्याचे आयोजन करणार्या साधकांना वैयक्तिक अडचणींमुळे सेवेचे दायित्व घेता आले नाही. त्यामुळे माझ्या मनात ‘सोहळा पुढे ढकलायचा का ?’, असा विचार येत होता. मी सद्गुरु दादांना सर्व अडचणी सांगितल्या. त्यांनी ‘नियोजित वेळीच सत्संग सोहळा घेऊया’, असे सुचवले. ‘येणार्या अडचणी पहाता मला हे शक्य नाही’, असे वाटून मी सर्व देवावर सोपवले. सद्गुरु दादांनी सोहळ्याच्या नियोजनात स्वतः लक्ष घातल्यावर अडचणी सुटत गेल्या आणि सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
४. साधकांना शिकण्याची संधी देणे
सद्गुरु दादांना सेवेच्या अनुषंगाने नवीन संकल्पना सांगितल्यास ते त्यातून साधकांना शिकण्याची संधी देतात, उदा. सत्संगातील जिज्ञासूंच्या नामजपात वाढ व्हावी, त्यांना नामजपाची गोडी लागावी, यासाठी जिल्ह्यात नामसत्संग चालू करण्यात आला. त्या नामसत्संगात १० मिनिटे साधनेविषयी सूत्रे सांगितली जातात आणि नंतर जिज्ञासूंकडून नामजप करून घेतला जातो. या सत्संगाला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा प्रतिसाद चांगला आहे.
५. साधकांना आधार देणे
सद्गुरु दादांना ‘ऑनलाईन’ सत्संगात जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेत येणार्या अडचणी किंवा त्रास’ यांविषयी सांगितल्यावर ते त्वरित उपाय सांगतात. ‘सत्संगातील जिज्ञासूंना असलेल्या एखाद्या अडचणीविषयी मी दिलेले दृष्टीकोन योग्य होते का ?’, हे पडताळून घेण्यासाठी मी सद्गुरु दादांना विचारल्यावर ते लगेच प्रतिसाद देतात. त्यामुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो आणि सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
६. इतरांचा विचार करणे
सद्गुरु दादांना सेवेविषयी एखादा लघुसंदेश केला आणि त्याचे उत्तर त्वरित मिळाले नाही, असे कधीच होत नाही. ते कितीही व्यस्त असले, तरीही ते सत्संगसेवकांचे आढावे वाचून प्रतिसाद देतात. त्यामुळे सर्वांना सेवेसाठी प्रोत्साहन मिळते.
७. अहंशून्यता
सद्गुरु दादांच्या वागण्या-बोलण्यात इतकी सहजता असते की, ते कुठेच स्वतःचे वेगळेपण जाणवू देत नाहीत. एकदा आम्ही एका गावात धर्मप्रचारासाठी गेलो होतो. तेथे सद्गुरु दादांनी सर्वांच्या समवेत भूमीवर बसून भोजन केले. एकदा आमच्या घरी एका सत्संगाचे आयोजन केले होते. तेव्हा एक जड ‘टीपॉय’ (लहान पटल) सरकवण्याठी ते स्वतःहून पुढे आले.
८. मायेतून अलिप्त
त्यांना कशाचीच आवड-नावड आणि आसक्ती नाही. ते कोणत्याही प्रसंगात अडकत नाहीत. ‘ते अखंड साक्षीभावात असतात’, असे मला वाटते.
९. स्वावलंबी
ते स्वतःचे कपडे स्वतः धुऊन वाळत घालतात. ते स्वतःचे साहित्य आवरून ठेवतात. ते सेवाकेंद्रात स्वतःचे जेवणही वाढून घेतात.
१०. ते वैयक्तिक कामासाठी जातांना सार्वजनिक वाहनाने प्रवास करतात. गुरुधनाचा काटकसरीने वापर कसा करायचा, त्याचा वस्तूपाठ म्हणजे सद्गुरु दादा !
११. कौटुंबिक कर्तव्ये निभावणे
अ. सद्गुरु दादांचे मोठे भाऊ श्री आरेश्वर मंदिरातील पूजा नियमित करतात. घरातील सदस्य कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करतात. सद्गुरु दादा सहज स्थितीत राहून कुटुंबियांना निरपेक्षपणे आणि कर्तव्यबुद्धीने साहाय्य करतात. त्यांनी ज्याप्रमाणे कुटुंबियांना गुण-दोषांसहित स्वीकारले आहे, तसे सर्वसामान्यांना कदापि शक्य नाही. त्यातून सद्गुरु स्थितीला असलेल्या व्यक्तीची महानता लक्षात येते.
आ. सद्गुरु दादा त्यांच्या कुटुंबियांशी आध्यात्मिक स्तरावर जोडले आहेत.
१२. अनुभूती
सद्गुरु सत्यवान कदम यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : सद्गुरु दादा मितभाषी असून ते हळू आवाजात आणि मोजकेच बोलतात. त्यांच्या हालचाली आणि बोलणे इतके हळूवार असते की, त्यांच्या ठिकाणी अनेक जणांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवते.
गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे आम्हाला सद्गुरु सत्यवानदादा मार्गदर्शक संत म्हणून लाभले आहेत. ‘आम्हाला सद्गुरु दादांचा आमच्या साधनेच्या दृष्टीने लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, सिंधुदुर्ग. (८.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |