उत्साहाने सेवा करणारे, धर्माभिमानी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

‘२७.३.२०२४ यादिवशी कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री. दिलीप सारंगधर यांचे निधन झाले. वर्ष २००७ मध्ये मी कोपरगाव येथे धर्मप्रचारासाठी गेलो होतो. तेव्हापासून त्यांची आणि माझी ओळख होती. मागील ५ वर्षे ते देवद आश्रमातील साधकांचे कपडे शिवून देत असत. त्या वेळी माझे त्यांच्याशी अधून-मधून बोलणे होत असे. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. दिलीप सारंगधर

१. निधनापूर्वी

१ अ. साधकांचा वेळ आणि पैसे वाचावेत, यासाठी ओळखीच्या दुकानातून स्वस्तातील आणि चांगल्या प्रतीचे कापड विकत घेणे आणि अल्प पैशांत कपडे शिवून देणे : कै. दिलीप सारंगधर यांच्यामध्ये नवीन कापड विकत घेणे आणि कपडे शिवणे याचे चांगले ज्ञान अन् कौशल्य होते. मी कापड विकत घेतांना त्यांना विचारून आवश्यक तेवढेच कापड घेत असे. पुष्कळ वेळा ते स्वतःच त्यांच्या ओळखीच्या दुकानातून साधकांसाठी स्वस्तातील आणि चांगल्या प्रतीचे कापड विकत घेत असत. त्यामुळे साधकांचा वेळ आणि पैसे वाचत असत. ते साधकांना आवडतील असे, आध्यात्मिक दृष्टीने लाभदायक, अल्प पैशांत आणि वेळेवर कपडे शिवून द्यायचे.

पू. शिवाजी वटकर

१ आ. उत्साहाने आणि आनंदाने सेवा करणे : त्यांचा स्वतःचा शिवणकामाचा (टेलरींगचा) व्यवसाय होता आणि ते इतर वैयक्तिक कामात व्यस्त असायचे. स्वतःचा व्यवसाय करत असतांनाही ते धर्मप्रचारासाठी पुष्कळ वेळ द्यायचे. ते हिंदु जनजागृती समितीची प्रत्येक मोहीम आणि उपक्रम यांमध्ये पुढाकार घेऊन सेवा करायचे. ते नेहमी सकारात्मक राहून उत्साहाने आणि आनंदाने सेवा करायचे.

१ इ. धर्माभिमानी आणि धर्मकार्याची आवड असणे : वर्ष २००७ मध्ये मी कै. दिलीप आणि त्यांचे भाऊ श्री. अशोक सारंगधर यांच्या समवेत १ आठवडा धर्मप्रचाराची सेवा केली होती. तेव्हा कै. दिलीप सारंगधर यांनी अत्यंत आवडीने आणि मनापासून ही सेवा केली होती. त्यांच्यामध्ये पुष्कळ धर्माभिमान होता.

१ ई. ‘आंतरिक साधना चालू असून त्यांची प्रगती होत आहे’, असे जाणवणे : मी कधी भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस केल्यावर ते आनंदाने १ – २ शब्दांत सकारात्मक अन् काहीतरी गमतीने बोलून चांगला प्रतिसाद द्यायचे. त्यानंतर आम्ही सेवेविषयी बोलायचो. ते नेहमी साधकांना साहाय्य करत असत. त्यामुळे ते आनंदी होते. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांची आंतरिक साधना चालू असून त्यांची प्रगती होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ उ. कृतज्ञताभाव : त्यांच्या चेहर्‍यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत, साधक, त्यांचे कुटुंबीय आणि सनातनचा आश्रम यांच्याप्रती कृतज्ञताभाव जाणवायचा.

२. निधनानंतर

अ. ‘काकांनी त्यांचा मृत्यूही स्थिर आणि सकारात्मक राहून स्वीकारला आहे’, असे मला वाटते.

आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे कै. दिलीप सारंगधर यांच्या सूक्ष्मदेहाकडून सेवा आणि साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटते. यावरून ‘जो जो श्रद्धेने श्री गुरुचरणी स्थिरावला । तो तो परात्पर गुरु डॉक्टरांनी उद्धरियेला ।।’, असे मला वाटते.

‘कै. दिलीप सारंगधर यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी प्रार्थना करून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.३.२०२४)


प्रेमळ आणि इतरांशी जवळीक साधणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर !

कै. दिलीप सारंगधर यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची पुतणी सौ. नमिता पात्रीकर आणि जावई श्री. निखील पात्रीकर यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सौ. नमिता पात्रीकर (पुतणी), फोंडा, गोवा.

१ अ. ‘श्री. दिलीपकाका नेहमी हसतमुख असायचे.

१ आ. ते नेहमीच स्वतःचा विचार न करता इतरांना साहाय्य करत.

१ इ. प्रेमभाव

१. ‘काकांमध्ये पूर्वीपासून प्रेमभाव आहे. घरात किंवा साधकांची कुणाची प्रकृती चांगली नसेल, तर ते त्यांना आधुनिक वैद्यांकडे नेऊन औषधोपचार करून ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांची योग्य ती काळजी घेत असत.

२. काकांना स्वयंपाकाची आवड होती. त्यांनी बनवलेले जेवण स्वादिष्ट असायचे. आम्ही एकत्र कुटुंब असल्याने आमच्याकडे कधी सद्गुरु, संत, धर्मरथ किंवा प्रसार यांतील साधक येत असत. काका त्यांच्यासाठी त्यांना आवडेल तो अन्नपदार्थ बनवून देत असत.

३. ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.

१ ई. पूर्वसूचना मिळूनही स्थिर आणि शांत असणे : काही दिवसांपूर्वी काका ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा’, हे गाणे म्हणत असतांना कुणीतरी त्याची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) केली. ती पहातांना ‘त्यांना ते जाणार असल्याची पूर्वसूचना होती’, असे मला वाटले. तेव्हाही ते आनंदी होते. ‘काही वाईट होणार’, याची पूर्वसूचना मिळाल्यावर आपण दुःखी होतो; परंतु काका स्थिर, शांत आणि समाधानी होते.

१ उ. निधनानंतर

१. काकांचे अंत्यदर्शन घेतले, तेव्हाही त्यांच्याकडे पाहून ‘ते समाधानाने गेले’, असे मला वाटले.

२. त्यांच्या चेहर्‍याकडे पाहून मला शांत वाटत होते.

३. ‘काकांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.’

२. श्री. निखील पात्रीकर (जावई), ढवळी, फोंडा, गोवा.

२ अ. इतरांशी सहजतेने जवळीक साधणे : ‘माझ्या लग्नाच्या वेळी आमच्याकडील पाहुणे आणि नमिताचे (माझ्या पत्नीचे) नातेवाईक हे एकाच रेल्वेने गोव्याकडे येत होते. याविषयी दिलीपकाकांना कळल्यावर त्यांनी स्वतःहून माझ्या नातेवाइकांचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी स्वतः बनवून आणलेले गुलाबजाम सर्वांना नेऊन दिले आणि सगळ्यांशी ओळखही करून घेतली. ‘काका लगेच इतरांना आपलेसे करून घेत असत’, असे त्यांच्या कृतीतून मला शिकायला मिळाले.

२ आ. अहं अल्प असणे : समाजातील अनेक लोकांना काकांनी जोडून ठेवले होते, तसेच साधकांना काका निरपेक्षपणे काम आणि सेवा यांमध्ये साहाय्य करायचे. त्यांच्या बोलण्यातून कधीच त्यांनी केलेल्या साहाय्याविषयी कर्तेपणा जाणवायचा नाही. ते नेहमी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला संधी देतात, तर त्याचा ‘लाभ करून घ्यायचा’, असेच सांगत.

२ इ. निधनानंतर

१. अंत्यदर्शनाच्या वेळी काकांच्या चेहर्‍याकडे पाहून शांत जाणवत होते.

२. वातावरणातही कुठल्याच प्रकारचा त्रास जाणवत नव्हता.

३. त्या दिवशी तुकाराम बीज होती; म्हणजेच संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस. ‘जणू काही काकांच्या लिंगदेहालाही वैकुंठात स्थान मिळाले आहे’, असे मला जाणवले.’ (२९.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक